Breking News

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

तळोद्यात आज जिल्हा साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद यांच्या संयुक्त विद्यमाने ८ वे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज दि.११ रविवारी रोजी तळोदा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलन अध्यक्षपदी निंबाजीराव बागुल असतील. याप्रसंगी परिसंवाद, बालकट्टा, कवि संमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. . तळोदा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आज (दि.११) सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येईल. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलिस अधिक्षक संजय पाटील, तळोदा प्रकल्पाधिकारी विनय गौडा, माध्यमिक शिक्षणाधिकारी राहूल चौधरी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, तळोदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.रामय्या उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष निंबाजीराव बागुल, स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे असतील. यावेळी श्रीमती जयाबाई कृष्णराव गावित, प्रा.डॉ.पितांबर सरोदे, वाहरु सोनवणे, दिनानाथ मनोहर, रमाकांत पाटील, अविनाश पाटील (धुळे), संभू पाटील (जळगाव) उपस्थित राहणार आहे. मान्यवरांचे स्वागत निखीलभाई तुरखिया, सुदामभाई पटेल, सुनिल सुर्यवंशी, वासुदेव गांगुर्डे, कांतीलाल पाडवी, हिरामण पाडवी, भगतसिंग पटले, भिमसिंग पवार, गोसा पेंटर, प्रविण पाडवी, शिवलाल वळवी स्वागत करतील. दुपारी १ ते २.३० यादरम्यान दोन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुख्य सभामंडपात पहिला परिसंवाद साहित्य, संस्कृती व कलेच्या समाजजीवनावरील परिणाम तर दुसरा परिसंवाद मराठी भाषा भगिनींचे सांस्कृतिक सौहार्दात योगदान असे आहेत. २.३० ते ४ दरम्यान जीटीपी महाविद्यालयाचे प्राध्यापक माधव कदम सानेगुरुजींच्या कथेचे नाट्यरुपी सादरीकरण करतील. दुपारी १ ते ४ दरम्यान बालकट्यात मी वाचलेले पुस्तक कविकट्टाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचा समारोप सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजेदरम्यान होणार आहे. समारोपीय भाषण संमेलनाचे उद्घाटक डॉ.श्रीपाद जोशी हे करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विश्वास पाटील, डॉ.अलका कुळकर्णी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर ७ ते १० या वेळेस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. संमेलनास साहित्य प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, अध्यक्ष प्रा.डॉ.पितांबर सरोदे, उपाध्यक्ष रमेश डी.चव्हाण, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंहळाचे कार्यवाह डॉ.इंद्रजित ओरके, कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, सहसचिव विजय बागुल, दत्ता वाघ, भिमसिंग वळवी, विनायक माळी, डॉ.सुनंदा पाटील, आर्कि.निरज देशपाठहे, सौ.सुनंदा भावसार, प्रविण पाटील, संदिप चौदरी, संजयकुमार शर्मा, सौ.सुलभा महिरे, राजू पाटील, कैलास मराठे यांनी केले आहे. .

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

तळोद्यातून पुन्हा बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

आईच्या प्रसंगावधानाने अपहरणकत्र्याने काढला पळ : पालकांमध्ये भीती शहरातील बसस्थानक परिसरातून काल दुपारी पुन्हा काळाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बाळाच्या आईच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांचा प्रयत्न असफल झाला. या घटनेमुळे शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. . याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील उर्मिला मनोज ढोले व रत्ना मुकेश ढोले या दोघी एकाच कुटुंबातील महिला आपल्या लहान बाळांसह देवदर्शनासाठी प्रकाशा येथे जात होत्या. तळोदा बसस्थानकात बसची प्रतिक्षा करीत असतांना त्याठिकाणी एक अज्ञात बाळांकडे एकटक पाहत हातवारे करुन खेळविण्याच्या प्रयत्न करीत होता. अचानक त्या अज्ञाताने उर्मिला मनोज ढोले यांचा सात महिन्याच्या प्रिन्स नामक बाळाला हातातून हिसकावून पळण्याच्या प्रयत्न केला. मात्र, उर्मिला ढोले यांनी बाळ हातातून सोडले नाही. जोरजोरात आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांनी धाव घेतली. गर्दी पाहून एका बसमध्ये बसून पळ काढण्यात अज्ञात यशस्वी झाला. . यापूर्वी देखील तळोदा शहरातील नुराणी चौकातील ११ वर्षीय तौफिक शेख या बालकास पळवून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. तौफिक याने प्रसंगावधान राखून नंदुरबार येथून अपहरणकत्र्याच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली होती. तर दोन दिवसांपूर्वी कल्पना टॉकीज परिसरात देखील एका १० वर्षीय मुलास पळवून नेण्याचा डाव फसला असल्याचे सांगण्यात येत आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण आले आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान, कालच्या घटनेबाबत तळोदा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही..



मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

तळोद्याचा अमोल करणार 'पे्रमाचा राडा'!

मराठी चित्रपटात मिळाली सहनायकाची भूमिका : मार्च मध्ये चित्रपट प्रदर्शित
तळोदा येथील अमोल कर्णकार या तरुणास दिग्दर्शक अवधूत खराडे यांच्या प्रेमाचा राडा या मराठी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली आहे. मार्च महिना अखेरीस चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा या गावाचा अमोल कर्णकार हा उदयोन्मुख कलाकार रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याने त्याची सर्वांनाच उत्सूकता लागून आहे. . दुर्गम भागातील तळोदा शहरात अजूनही काही सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. स्थानिक कलावंतांसाठी कुठलेही स्टेज उपलब्ध नसताना शहरातील कलावंतांच्या कलेला विविध माध्यमातून वाव मिळत आहे. कठोर मेहनत, जिद्द व चिकाटी या त्रिसुत्राच्या जोरावर सामान्य कुटुंबातील अमोल कर्णकार या युवकाने अभिनयन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तळोदा येथील वनरक्षक वासुदेव माळी यांचा मुलगा अमोल हा मुंबई मायानगरीत जाऊन आपल्या परिश्रमाच्या जोरावर अभिनय क्षेत्रात आपले नशिब अजामाविण्यासाठी दाखल झाला आहे.शहादा महाविद्यालयात एम.बीएचे शिक्षण घेत त्याच्यातील
 कलाकार त्याला अभिनय क्षेत्रात काही तरी करण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असल्याने विविध ठिकाणी स्पर्धेत तो सहभागी होत होता. यासाठी त्याला अनेक पारितोषिके देखील प्राप्त झाली आहेत. एके दिवशी फेसबुकवरून प्रेमाचा राडा या चित्रपटासाठी साईड हिरो साठीची ऑडिशन बाबतची जाहिरात त्याने पहिली. सदर जाहिरात पाहून आपणही अभिनय क्षेत्राकडे वळावे, याबाबत एक प्रयत्न जरूर करावा असे त्याला वाटले. याबाबत त्याने आपल्या मित्रांना व आई वडिलांना कल्पना दिली. आई वडिलांनी देखील होकार दिल्याने अमोलने तातडीने फलटण गाठले. योगायोगाने पहिल्याच ऑडिशनमध्ये त्याची निवड झाली. दिग्दर्शक अवधूत खराडे यांच्या आगामी चित्रपट प्रेमाचा राडा या चित्रपटात मुख्यनायकाचा मित्राचे पात्र करण्याची संधी अमोलला मिळाली आहे. या चित्रपटाचे निर्माते मोहन घोडके आहेत. .प्रेमाचा राडा ही एक
प्रेम कथा असून यात मुख्यनायक म्हणून दीपक पारसे, मुख्यनायिका ऐश्वर्या घोडके आहेत. खलनायक म्हणून मराठी चित्रपटातील संजय खापरे व जयवंत भालेकर, नितीन सरवदे या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चित्रपट हा प्रेम कथेवर आधारित असुन पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथे त्याचे चित्रिकरण झाले आहे. येत्या मार्च अखेरीस दोनशे चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामाध्यमातून अमोलचे स्वप्न साकार होणार असून याचे सर्व श्रेय तो आई-वडिलांना देतो. या चित्रपटातील अभिनय पाहून त्याला महाराष्ट्र कलाकार संघटनेचे अध्यक्ष लुनेश्वर भालेराव व नितीन सरोदय यांनी एका हिंदी चित्रपटासाठी त्याची निवड केली आहे. सध्या तो वर्दी या मालिकेत झळकणार आहे. तर अधुरी एक प्रेम कथा या चित्रपटात मुख्य नायकाचा रोल मिळाला असून एप्रिल नंतर या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे..