Breking News

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

तळोद्याचा अमोल करणार 'पे्रमाचा राडा'!

मराठी चित्रपटात मिळाली सहनायकाची भूमिका : मार्च मध्ये चित्रपट प्रदर्शित
तळोदा येथील अमोल कर्णकार या तरुणास दिग्दर्शक अवधूत खराडे यांच्या प्रेमाचा राडा या मराठी चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली आहे. मार्च महिना अखेरीस चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा या गावाचा अमोल कर्णकार हा उदयोन्मुख कलाकार रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याने त्याची सर्वांनाच उत्सूकता लागून आहे. . दुर्गम भागातील तळोदा शहरात अजूनही काही सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. स्थानिक कलावंतांसाठी कुठलेही स्टेज उपलब्ध नसताना शहरातील कलावंतांच्या कलेला विविध माध्यमातून वाव मिळत आहे. कठोर मेहनत, जिद्द व चिकाटी या त्रिसुत्राच्या जोरावर सामान्य कुटुंबातील अमोल कर्णकार या युवकाने अभिनयन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तळोदा येथील वनरक्षक वासुदेव माळी यांचा मुलगा अमोल हा मुंबई मायानगरीत जाऊन आपल्या परिश्रमाच्या जोरावर अभिनय क्षेत्रात आपले नशिब अजामाविण्यासाठी दाखल झाला आहे.शहादा महाविद्यालयात एम.बीएचे शिक्षण घेत त्याच्यातील
 कलाकार त्याला अभिनय क्षेत्रात काही तरी करण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असल्याने विविध ठिकाणी स्पर्धेत तो सहभागी होत होता. यासाठी त्याला अनेक पारितोषिके देखील प्राप्त झाली आहेत. एके दिवशी फेसबुकवरून प्रेमाचा राडा या चित्रपटासाठी साईड हिरो साठीची ऑडिशन बाबतची जाहिरात त्याने पहिली. सदर जाहिरात पाहून आपणही अभिनय क्षेत्राकडे वळावे, याबाबत एक प्रयत्न जरूर करावा असे त्याला वाटले. याबाबत त्याने आपल्या मित्रांना व आई वडिलांना कल्पना दिली. आई वडिलांनी देखील होकार दिल्याने अमोलने तातडीने फलटण गाठले. योगायोगाने पहिल्याच ऑडिशनमध्ये त्याची निवड झाली. दिग्दर्शक अवधूत खराडे यांच्या आगामी चित्रपट प्रेमाचा राडा या चित्रपटात मुख्यनायकाचा मित्राचे पात्र करण्याची संधी अमोलला मिळाली आहे. या चित्रपटाचे निर्माते मोहन घोडके आहेत. .प्रेमाचा राडा ही एक
प्रेम कथा असून यात मुख्यनायक म्हणून दीपक पारसे, मुख्यनायिका ऐश्वर्या घोडके आहेत. खलनायक म्हणून मराठी चित्रपटातील संजय खापरे व जयवंत भालेकर, नितीन सरवदे या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चित्रपट हा प्रेम कथेवर आधारित असुन पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथे त्याचे चित्रिकरण झाले आहे. येत्या मार्च अखेरीस दोनशे चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामाध्यमातून अमोलचे स्वप्न साकार होणार असून याचे सर्व श्रेय तो आई-वडिलांना देतो. या चित्रपटातील अभिनय पाहून त्याला महाराष्ट्र कलाकार संघटनेचे अध्यक्ष लुनेश्वर भालेराव व नितीन सरोदय यांनी एका हिंदी चित्रपटासाठी त्याची निवड केली आहे. सध्या तो वर्दी या मालिकेत झळकणार आहे. तर अधुरी एक प्रेम कथा या चित्रपटात मुख्य नायकाचा रोल मिळाला असून एप्रिल नंतर या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे..




 










 






























शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

अखेर प्रकल्पाधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांच्या सेवा समाप्तीचे आदेश

अपहार व फसवणूकीच्याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल होऊन दोन वर्षापासून जिल्हा कारागृहात बंदीवासात असलेल्या तसेच फौजदारी व न्यायालयीन कारवाई सुरु असलेल्या आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या तळोदा प्रकल्पाचे परिविक्षाधिन प्रकल्पाधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांना निलंबित करण्यात आले आहे. शासनाचे सहसचिव सुनिल पाटील यांनी दुधाळ यांच्या सेवा समाप्तीचे आदेश बजावले आहेत. . याबाबत सविस्तर वृत्त असे की, आदिवासी विकास सेवेतील प्रकल्पाधिकारी या पदावर शुक्राचार्य दुधाळ यांची शासन निर्णयान्वये नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, दुधाळ यांनी परिविक्षा कालावधीत कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त केला नाही. तसेच काम व वर्तवणूक अयोग्य व अशोभनिय आढळून आले. यासंदर्भात ५ ऑक्टोबर २०१५ रोजी तळोदा पोलिस ठाण्यात दुधाळविरुद्ध भादंवि कलम ४०९, ४२०, ४६७, ४३८, ४७१, ४७७ (अ), ३४ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधाळ हे दि.२ फेब्रुवारी २०१६ पासून नंदुरबार जिल्हा कारागृहात बंदीवासात असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी व न्यायालयीन कारवाई सुरु आहे. यामुळे शासन परिपत्रक दि.७ मार्च १९८३ मधील तरतूदीनुसार दुधाळ यांना सेवेतून कमी करण्यास पात्र ठरत असून शासन निर्णय ८ जानेवारी २०१३ मधील अट क्र.(२)नुसार तसेच शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र.पीएससी-१०८०/१११८/सीएन/८२/८०/८ दि.७ मार्च १९८३ मधील तरतूदीनुसार शुक्राचार्य दुधाळ यांच्या सेवा समाप्तीचे आदेश सहसचिव सुनिल पाटील यांनी बजावले आहेत.. दरम्यान शुक्राचार्य दुधाळ यांनी यावल येथील आदीवासी प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी म्हणून देखील सेवा बजावली आहे. त्यांच्या प्रकल्प अधिकारीच्या कार्यकाळात आदीवासी वसतीगृहाच्या मुलांनी मोठे आंदोलन केले होते. शुक्राचार्य दुधाळ यांची प्रशासकीय कारकीर्द ही वादग्रस्त ठरली.. *शिष्यवृत्ती अपहार प्रकरणात संशीयितआरोपी* तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ, दिनेश कोळी रा. नंदुरबार तसेच तुळजा भवानी महिला मंडळ आष्ठी, जिल्हा बीड यांचे अध्यक्षा श्रीमती. नालंदा बलभिम खाडे, श्रीमती. कमल मधुकर दळवी उपाध्यक्ष, श्रीमती. संगीता विष्णु दळवी सचिव, व स्वामी समर्थ सामाजिक बहुउदेशिय विकास संस्था, रंजाने तालुका शिंदखेड़ा, जिल्हा धुळे यांचे पदाधिकारी श्री.दिलीप संपत पाटील अध्यक्ष, साहेबराव मंगा बागुल उपाध्यक्ष, श्रीमती हीराबाई दीपचंद पाटिल सचिव, आदीं अपहार केला प्रकरणी बंदिवासात आहेत...



गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

अखेर त्या बछड्याने सोडला प्राण!

१७ दिवसापासून सुरु होता मृत्यूशी संघर्ष : वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाच्या प्रयत्नांना अपयश ऊसाची पाचट जाळतांना आगीत होरपळलेल्या बिबट्याच्या बछड्याचा गेल्या १७ दिवसापासूनची मृत्यूशी सुरु असलेली झुंज काल संपली. बुधवारी सकाळी ८ वाजेचा सुमारास हा बछडा गतप्राण झाला. वनविभागाच्या व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर हा बछडा वाचविण्यात अपयश आले आहे. बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी या ठिकाणी उपस्थितांचे डोळे पानावले. . तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील गोंडाळा शिवारात दि.२४ डिसेंबर रोजी एका शेतात ऊसाची पाचट जाळण्यासाठी आग लावण्यात आली होती. दुर्देवाने या ऊसाचा शेतात बिबट्याचे नर-मादी १५ दिवसाच्या तीन पिलांसह वास्तव्यास होते. दरम्यान पाचट जाळण्यावेळी आगीतून नर-मादी आपल्या एका पिलासह शेतातून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. मात्र, दोन बछडे या आगीत होरपळले होते. त्यापैकी एकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला होात. तर दुसरे भाजल्याने जखमी झाले होते. मागील १७ दिवसा पासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सामुद्रे या बछड्यावर उपचार करीत होते. आवश्यकवेळी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनानुसार बछड्यावर उपचार सुरू होते. बऱ्यापैकी जखमा भरल्याने बछडयाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मादीच्या दुधाची भर निघावी यासाठी इतर पर्यायी पोषक द्रव्ये देण्यात आली. मात्र, आईच्या मायेची ऊब, तिच्या दुधापासून मिळणारे पौष्टिक घटक, प्रोटिन्स तसेच नैसर्गिक वातावरण न मिळाल्याने सातत्याने डिहायड्रेट होणे, वजनात घट होणे आदी प्रकार घडत होते. वन विभागाचे कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी त्याची काळजी घेत होते. बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते कर्मचाऱ्यांमध्ये चांगलेच रमले होते. वनपाल चव्हाण यांनी त्याचे महाराणी असे नाव ठेवले होते. महाराणी म्हणताच बछडे धावत येऊन त्यांच्या मांडीवर बसत होते. अंगाखांद्यावर खेळणे, लाड करणे, एवढे घट्ट नाते या बछड्याला सांभाळ करणाऱ्या वनपाल चव्हाण व वनमजूर इलमशी जुडले होते. मात्र, गेल्या दोन दिवसापासून पुन्हा वरील कारणांमुळे बछड्याची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर तातडीने आवश्यक ते उपचार करण्यात आले. मात्र, अथक प्रयत्नानंतरही बछड्यास वाचविण्यात अपयश आले. काल सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या बछड्याने आपला प्राण सोडला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सामुद्रे यांनी त्याचे शवविच्छेदन केले.वनविभागाच्या परिसरात या बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनसंरक्षक थोरात, वनक्षेत्रपाल सी.डी. कासार, वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक एस.डी.मोरे, वनरक्षक इलम आदी उपस्थित होते. मागील १७ दिवसापासून या बछड्याची स्वत:च्या लेकरासारखी काळजी घेणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतरही बछड्यास वाचवण्यात अपयश आल्याने यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते..

 मागील १७ दिवसापासून बछड्यावर उपचार सुरू होते. आगीत जवळपास ३०-४० टक्के ते भाजले होते. दरम्यान, स्वत:च्या बाळासारखी त्याची निगा राखली. यामुळे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या बछड्याशी भावनिक नाते प्रस्तापित झाले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, बिबटचे पिलू फारच लहान असल्याने शेवटी त्याने निरोप घेतला. प्रयत्न करुनही यश न आल्याने सर्वांनाच खुप दु:ख होत आहे.. -थोरात. उपवनसंरक्षक, तळोदा.





शनिवार, ६ जानेवारी, २०१८

' त्या' जखमी बछड्याची प्रकृती खालावली.

ऊसाची पाचट जाळण्यात आलेल्या आगीतून बचावलेल्या बिबट्याच्या जखमी बछड्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. त्या बछड्याच्या वजनाही घट होवू लागली असल्याने त्याची प्रकृती सुधारण्याचे वनविभागासमोर आव्हान उभे राहिले आहे..
                                                          तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील गोंडाळा शिवारात शेतातील ऊसाची पाचट जाळण्यासाठी लावण्यात आलेल्या आगीत बिबट्याच्या दोन बछड्यापैकी एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी झाला होता. या जखमी बछड्यावर वनविभागाने उपचार सुरु केले. पंजे, तोंडाचा भाग व शेपूट भाजल्याने त्यावर वनविभागाकडून उपचार सुरू होते. तापमान संतुलन ठेवण्यासाठी पेटी बनवून त्यात लाईट लावून तापमान संतुलन केले जात होते. तसेच जळगाव, नंदुरबार, पुणे व बोरीवली नेशनल पार्कच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार बछड्यावर उपचार सुरु आहेत. बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा जाणवत होती, पिलूचा अंगावरील आगीच्या जखमाही बऱ्या झाल्या होत्या. मात्र बिबट्या मादीचे दुध मिळत नसल्याने बछड्याची प्रकृती आणखीनच खालावत आहे. चार दिवसांपासून वजनात घट झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सामुद्रे हे बच्छड्यावर उपचार करीत असून वेळोवेळी तपासणीने त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, संजय अहिरे, वनक्षेत्रपाल सी.डी.कासार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या बछड्याच्या आरोग्याची माहिती देत आहेत. तसेच वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक एस.डी.मोरे, वनरक्षक भिका चौधरी हे बछड्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत..

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

'त्या' बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा!

ऊसाची पाचट जाळत असतांना आगीत होरपळलेल्या बिबटच्या पिलूची प्रकृती खालवली होती. मात्र, वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून त्या बछड्याची प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत आहे. त्याचे वजनही वाढत असून उपचाराला प्रतिसाद मिळत असल्याने संबधितांनी समाधान व्यक्त केले आहे. . तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील गोंडाळा शिवारात ऊसाची पाचट जाळण्यासाठी लावलेल्या आगीत दुर्देवाने बिबट्याने एक बछडे होरपळून जखमी झाले आहे. या उसाचा क्षेत्रात बिबट्यासह मादी तीन पिलासह अस्तित्व करून होती. शेतातील पाचटला आग लावल्यावेळी नर-मादी बिबट्या व पिलू शेताबाहेर सुरक्षित निघण्यात यशस्वी झाले. मात्र या आगीत दोन पिलू होरपळले होते. यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. आगीत होरपळून जखमी झालेल्या दुसऱ्या बछड्याला वनविभागाने ताब्यात घेत त्याच्यावर उपचार सुरु केले. या बछड्याचे पंजे, तोंडाचा भाग व शेपटीचा काही भाग भाजलेला आहे. वनविभागाकडून या बछड्यावर सातत्याने उपचार करण्यात येत आहेत. त्याच्या अंगावरील आगीचा जखमा बऱ्यापैकी दुरुस्त झाल्या आहेत. मात्र, त्याला आईचे दुध व त्यापासून मिळणारे प्रोटिन्सचा अभाव, मायेची ऊब तसेच नैसर्गिक वातावरणाअभावी गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्याच्या वजनात घट दिसून येत होती. या बछड्याची प्रकृती खालावत असल्याने वनविभाग व त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही चितेंत पडले होते. मात्र, अथक पयत्नानंतर त्या बछड्याचे वजन वाढण्यास सुरुवात झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे या बछड्यावर उपचार करीत आहेत. सहाय्यक वनसंरक्षक हेमंत शेवाळे व संजय अहिरे, वनक्षेत्रपाल सी.डी.कासार हे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बछड्याच्या आरोग्याबाबत माहिती घेत आहेत. वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक एस.डी.मोरे, वनरक्षक भिका चौधरी, एन.पी.पाटील, सी.डी.कासार, एच.बी.चव्हाण, आर.जी.राजपूत, इ.जी.वसावे, बापू धनगर, भगवान पाटील, नितीन मगरे, भगवान पाटील हे वनविभाग पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी त्यावर लक्ष ठेवून आहेत..

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

तळोदा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या भाग्यश्री चौधरी स्वीकृत सदस्यपदी भाजपाचे हेमलाल मगरे व काँग्रेसचे जितेंद्र सूर्यवंशी यांची निवड

तळोदा येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या भाग्यश्री योगेश चौधरी या विजयी झाल्या. तर स्विकृत नगरसेवक पदी भाजपाचे हेमलाल पुरुषोत्तम मगरे व काँग्रेसचे जितेंद्र लक्ष्मण माळी यांची निवड करण्यात आली. नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी नवनिर्वाचितांचा सत्कार केला.. तळोदा नगरपालिकेत भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यासह ११ नगरसेवक असे बलाबल आहे. तर काँग्रेसचे सहा तर शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. काल सोमवारी उपाध्यक्ष व स्विकृत सदस्य पदासाठी निवडीची प्रक्रिया पार पडली. सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. उपनगराध्य पदासाठी भाजपातर्फे भाग्यश्री योगेश चौधरी व काँग्रेसतर्फे अनिता संदीप परदेशी यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात भाजपाच्या भाग्यश्री चौधरी यांना ११ तर काँग्रेसच्या अनिता परदेशी यांना सहा मते मिळाली. शिवसेना नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांनी मतदानात भाग न घेता त्या तटस्थ राहिल्या. स्विकृत सदस्य पदाच्या दोन जागांसाठी भाजपातर्फे हेमलाल मगरे व योगेश चौधरी यांचे अर्ज दाखल केले होते. यात हेमलाल यांची निवड करण्यात आली. काँग्रेसतर्फे जितेंद्र लक्ष्मण सुर्यवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेसच्या स्विकृत नगरसेवकपदी जितेंद्र माळी यांची निवड करण्यात आली. भाजपाचे हेमलाल मगरे व काँग्रेसचे जितेंद्र सूर्यवंशी यांची निवड झाल्यानंतर दोन्ही गटातर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. सभेला भाजपाचे गटनेते भास्कर मराठे, रामानंद ठाकरे, सुरेश पाडवी, योगेश पाडवी, अमणोद्दीन शेख, अंबिका शेंडे, बेबीबाई पाडवी, सुनयना उदासी, शोभाबाई भोई, सविता पाडवी तर काँग्रेसचे नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, कल्पना पाडवी, अनिता परदेशी, हितेंद्र क्षत्रिय व शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर उपस्थित होते. . यावेळी भाजपाचे कुकरमुंडाचे माजी उपसरपंच भास्कर बांडे, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, प्रदीप शेंडे, योगेश चौधरी, जालिंदर भोई, माजी नगरसेवक हिरालाल पाडवी, गोकुळ पवार, जगदीश परदेशी, माजी नगरसेवक प्रल्हाद पाडवी, कैलास चौधरी, नितीन पाडवी व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे माजी नगरसेवक सतीवान पाडवी, संदीप परदेशी, योगेश मराठे, रोहन माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी व स्विकृत नगरसेवक हेमलाल मगरे यांनी आ.उदेसिंग पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विकास कामे करण्यात येवून सुंदर व विकसित शहर निर्माण करण्याचे सांगितले..