Breking News

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

उदार, दिलदार, सदाबहार मित्र बाप्या !

सुधाकर मराठे 
              काय म्हणावे तुझ्या मैत्रीला, देवाने दिलेली एक साथ सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारा माझे कितीही चुकले असेल तरी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार माझ्यावर येणाऱ्या संकटांचा पहिला वार अंगावर घेण्याची तयारी दाखवणारा मनाने अतिशय मोकळा सदैव माझी पाठ राखण करणारा असा देवरूपी दिलेला एक सखा म्हणजे प्रिय मित्र राकेश गुरव उर्फ बापू ...
       तुझी माझी पहिली भेट ही वयाच्या अवघ्या नऊ-दहा वर्षाचा असताना झाली तू काबाडकष्ट करून पतंग विकायचा तुटलेल्या पतांगाना जोडणी करायचा त्यावेळी मी तिथे पतंग घेण्यासाठी येत असे, त्यानंतर शालेय जीवनात आपली चांगलीच गट्टी जमली तू मला मित्र या नात्यापेक्षा जास्त सन्मान दिला माझा प्रत्येक छोट्या-मोठ्या दुःखात तुझ्या सहभाग जाणवत होता आणि याची जाणीव म्हणून मी देखील तुझ्यासोबत मैत्री जपली, तुझे जे काही भले होईल त्यासाठी मी ही प्रयत्न केले. 
             पहाटे पाच वाजेपासून आपल्या भेटीची सुरुवात व्हायची हातात टमरेट घेवून गेलो तरी घरचे शोधत आपणास यायचे हा गमतीचा भाग असला तरी सहवास यातून दिसतोच. शालेय आयुष्य असो की महाविद्यालयीन आयुष्य मैदानी खेळ असो वा अन्य काही खोडी असोत आपण सोबत एकत्रित केल्यात मात्र या सर्व बाबी घडत असताना आपणामुळे कुणाचे भावनिक, मानसिक, शारीरिक आर्थिक असे कुठलेही नुकसान झाले नाही हे आपले सौभाग्यच.. शिक्षणात तुला गोडी नसली तरी अन्य बाबतीत तुझी महत्त्वाकांक्षा फार मोठी होती त्यातच तुझ्यात असलेले देशप्रेम व देशाप्रती असलेली निष्ठेमुळे तू देश सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता तू देश सेवेत जावे यासाठी प्रयत्नही केलेस मात्र त्यात तुला यश आले नाही. असो प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या नशिबी असतेच असे होत नाही, तू त्या क्षणाला मुकला असला तरी तू जे ही काही केले त्यात तू समाधानी आहेस हे महत्वाचं, या सर्वांमध्ये तुझ्या खोडकर व सर्वांना हसवणारा हा स्वभाव सर्वांना हवाहवासा वाटतो.. तू जेथे गेले तेथे तुझे स्वतंत्र ओळख निर्माण करतो. गणपतीवर असलेले तुझी अपार श्रद्धा, विविध वाद्यांच्या व गायनाचा छंद व आवड ही तू आजही जोपासले आहे..

        अत्यंत हलाखीचा परिस्थितीवर मात करत तू पुढे आयुष्याचा गाडा ओढत आहे. वडील अरुण व आई मोतन यांनी दिलेले संस्काराच्या धडे युधिष्ठिर सारखा लाभलेला मोठा बंधू त्यांनी वेळोवेळी पाजवलेले बाळकडू त्यात मोठ्या वहिणीचा रूपात मिळालेली माया लहान भावाची साथ व आजीच्या आशीर्वादामुळे तू आयुष्याचा पटलावर भक्कमपणे उभा आहे.  
     
      सुरुवातीच्या काळात तुझ्यात जी ऊर्जा होती ती खूप अफाट होती तू खूप हुरहुन्नरी होतास, एका कामावर बसून न राहता असंख्य कामे करण्याचे तुझे धडपड मी पाहिले आहे. अगदी कमी वयात बाजाराची चाहूल तुला लागल्यामुळे बाजाराची ओळख तुला प्राप्त झाली होती, लहान वयापासूनच कधी फोटोग्राफी तर कधी मेकॅनिकलच्या दुकानावर तर कधी पतंग विकताना येवढेच काय तर कधी रस्त्यावर पडलेले भंगार उचलून विकून २ पैसे कमविताना मी तुला पाहिले आहे, काहीही झाले तरी कुठेही कमी पडणार नाही अशा तुझ्यातला जोश मी पाहिले आहे. अगदी नोकरी नाही लागली तरी तळहातावर मेहनत करून पोट भरण्याची तळमळ व मेहनत करण्याची अफाट इच्छा तुझ्या अंगी पाहिली आहे आणि त्या जोरावर मी सुद्धा पावलं उचलले, अगदी लहान वयातच आपण दोघांनी सोबत मंडप बांधले मंडळ बांधण्यापासून प्राप्त झालेल्या दोन पैशाची गुंतवणूक करण्यास आपण सुरुवात केली.. 
             काहीही झाले तरी आपण सोबत राहू, आयुष्य जगताना असंख्य स्वप्न सोबत बघितली, सुरुवातीचा काळ हा खूप गरीबीचा होता असे असले तरी आपण कुठे बडेजावं पणा केला नाही परिस्थितीशी झुंजत आनंद साजरा केला मग तो अगदी सोबत असून हाप चड्ड्यांवरती फिरणे असो किंवा कॉलेजमध्ये लुंगी घालून हिंडणे असो, आपण फार धिंगाणा घातला आयुष्याला आनंद साजरा केला तो आनंद पाहून अनेकांना हेवा देखील वाटला.. काळ लोटात गेला 25 वर्षे पेक्षा अधिक कालावधी लोटल्या आपला सहवासाला मात्र नाते आपले आजही तेवढेच घट्ट आहे. तुझा नातेवाईक असोत व मित्र परिवारात मला कधीही स्वतः ओळख करून द्यावी लागली नाही कारण माझे गुणगान तू माझ्या पश्चात त्यांच्या पुढे गायलेले मला प्रत्येक वेळेस जाणवले आहे. दिपाली वहिनी चा रूपात तुला लाभलेली अर्धांगिनी ही देखील तुला साजेशी व वळणावर आणणारी असल्याकारणाने तिचे देखील कौतुक करण्यासारखे आहे.  तुमच्या संसारात अधिक गोडवा निर्वाह म्हणून देवाने दिलेले दोन मुले हे तुमच्या जीवनाचा आधार आहेत.
      माझ्या मनातील प्रवाह मोकळा करण्यासाठीचे हक्काचे ठिकाण म्हणजे तू कुठलीही बाब निडरपणे पूर्ण विश्वास ठेवून तुझ्याशी चर्चा करू शकतोस कारण चांगल्या गोष्टींचे भांडवल होईल व वाईट गोष्टीला बोलायला जाईल एवढा विश्वास अगदी बालवयातच माझा तुझ्यावर बसला आहे आणि तो आजही कायम आहे भविष्यातही कायम असेल यात तीळ मात्र शंका नाही.
             मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरोधात उभं असतं, तेव्हा मित्रच आपल्यासोबत असतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती खऱ्या मित्राच्या शोधात असते, जो मित्र आपल्या सुख-दु:खात नेहमी आपल्यासोबत असतो तोच खरा मित्र बाकी सर्व प्रवाह असतात.

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

तळोदा गणेशोत्सवाचे एक आकर्षण ;ओंकार काका गाढे

गणरायावर विशेष श्रद्धा असणारे तळोदा येथील ओंकार शंकर गाढे हे मागील 50 वर्षापासून सार्वजनिक दादा गणपती मंडळात सक्रिय आहेत. दरवर्षी गणरायाच्या स्थापनेपासून मूर्तीची विटंबना होऊ नये याकरिता देखरेखेची जबाबदारी  त्याच्याकडे असते. त्याकरिता 11 दिवस मंडपातच त्याचा पडावा असतो. शेवटल्या दिवशी  कागद व बांबू पासून साकारलेले प्राणी व पशुचे प्रतिकात्मक अवतार धारण करून ते मिरवणूकित सहभागी होतात. मागील 50 वर्षांपासून अखंडीतपणे सुरू असलेल्या हा अवतारी उपक्रम आजही मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. 
              ओंकार गाढे यावर्षी कुठला अवतार बनवतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. यंदाचा मिरवणुकीत गाढे यांनी अश्व तयार केले होते. अश्वनृत्य पाहण्यासाठी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. ओंकार गाढे हे हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. ओंकार गाढेचे सार्वजनिक दादा गणपती  मंडळाला लाभलेले कार्य उल्लेखनीय आहे. यावरूनच त्यांची गणराया बद्दल असलेली श्रद्धा लक्षात येते. वयाच्या आकडेवारीत म्हातारपण आलेला पण तरुणाला ही लाजवणारे 72 वर्षीय ओंकार गाढेचा या कार्याला सर्वाच दाद मिळत आहे... ह्यापुर्वी स्व: बाबू परदेशी हे गंणेशोत्सवापूर्वी सवा महीना उपवास करुण विसर्जनाच्या दिवशी हनुमानाचे रूप धारण करत होते. त्यांचे हे रूप पाहण्यासाठी कल्लोळ गर्दी दाटत होती. त्यानंतर ओंकार गाढेनी ही परंपरा कायम ठेवली आहे....

        सन 2024 मध्ये सरासरी पावसाचे प्रमान अधिक असल्याने व निकृष्ट रस्ते कामे झाल्यामुळे पालिकेचे पितल उघडे पडले होते. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वसाहतीतील रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने वाहने चालवणे जिक्रीचे झाले यावर उपाय म्हणून ओंकार गाढे हे स्वयंप्रेरणेने माती टाकून खड्डे बुजवन्याचे कार्य केल्यामुळे त्यांची ही कृती अनेकांसाठी प्रेरणाच्या विषय ठरली आहे. 
       

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

निर्भीड, सामाजिक वसा घेतलेलं, कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व : श्री. वतनकुमार मगरे साहेब....

"झाले बहू, आहेत बहू, होतील बहू" या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच उच्च ध्येय बाळगून, आत्मविश्वासाने प्रयत्नांची पराकाष्टा करून तळोद्यातील वतनकुमार मगरे हे यशाची एकेक पायरी चढून सार्वजनिक बांधकाम विभागात उच्च पदस्थ अधिकारी बनले. निर्भीड, सडेतोड, निगर्वी, हजरजबाबी, कुटुंबवत्सल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून ते नेहमीच गोरगरिबांना मदत करीत असतात तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. एकत्र कुटुंब पद्धतीवर त्यांचा भर असून प्रचंड व्यापातून देखील ते कुटुंबाची काळजी घेतात. वतनकुमार मगरे हे महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे माजी कोषाध्यक्ष तथा अखिल भारतीय माळी महासंघाचे माजी चिटणीस, विश्वस्त वामनराव देवचंद मगरे यांचे सुपुत्र आहेत.


जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या ठसा उमटविणारे वतनकुमार वामनराव मगरे यांच्या जन्म तत्कालीन धुळे जिल्ह्यातील तळोदे तालुक्यात ३ सप्टेंबर १९६९ रोजी झाला. लहानपणापासून ते शांत आणि अभ्यासात हुशार होते. प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत बहुतेकदा त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षक धुळे येथील महाजन हायस्कुलमध्ये झाले. सुरुवातीला त्यांची घरची आर्थिक परिस्थिती तेवढी मजबूत नव्हती, त्यातल्या त्यात त्यांच्या स्वाभिमानी स्वभाव होता, यामुळे त्यांचा पुढील शिक्षणाची व नोकरीची चिंता त्यांचा वडिलांना सतावत होती. दहावी पास झाल्यानंतर भारतीय नौदलात जाण्याची संधी त्यांना मिळाली होती. परंतु पुढील शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांनी ती संधी नाकारली. आणि दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर खामगाव येथील गव्हर्मेंट पॉलीटेक्निकला प्रवेश घेतला. नंतरचे दोन वर्ष पुन्हा धुळे येथे शिक्षण घेतले. वडील वामनराव मगरे हे सुद्धा उच्चशिक्षित होते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. परंतु काम करणारे वरिष्ठ अभियंते त्यांचे श्रेय घेत कारण ते पदवीधारक होते. आपल्या विषयाचे अपेक्षित ज्ञान नसताना केवळ पदवीमुळे इतरांना मान मिळतो आणि धन ही मिळते. मग मी ही पदवी का मिळवू नये असे ठरवून त्यांनी देखील बीई करण्याचे ठरवले. मात्र त्यावेळी ते नोकरी करीत होते आणि त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मालकाला सांगितले. हुशार आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती आपल्याला सोडून जातो आहे, म्हणून मालकाने वतनकुमारांची मनधरणी केली आणि नोकरी सोडू नका मी तुम्हाला माझ्या धंद्यात भागीदारी देतो असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. अत्यंत विनम्रपणे त्यांनी मालकाला सांगून त्यांच्या भावी जीवनाची कल्पना देऊन नोकरी सोडली आणि धुळे येथील एसएसव्हीपीएस संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वार्षिक परीक्षेत प्रथम आल्याने तिसऱ्या वर्षी ते महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी झालेत तर चौथ्या वर्षाला त्यांना युनिव्हर्सिटी रीप्रेझेंटटेटीव होण्याचा मान मिळाला. जनरल सेक्रेटरी झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम त्यांच्याकडे होते. दरम्यान एकदा वडील वामनराव यांचे लक्ष घरातील देव्हाऱ्याकडे कडे गेले, तिथे त्यांना एक रामपुरी चाकू दिसला. वडील अचंबित झाले त्यांनी वतनकुमारांना चाकू बाबत विचारले. चाकू माझ्याच आहे असे उत्तर वतनकुमार यांनी दिले. स्वभावाने अत्यंत मवाळ, धार्मिक, कोणालाही दुःख न देणाऱ्या व्यक्तीकडे हा चाकू कसा? त्यांनी परत विचारले. तेव्हा वतनकुमार यांनी उत्तर दिले की, बापूजी चाकू मला नाईलाजाने जवळ ठेवावा लागतो. कारण परराज्यातील काही विद्यार्थी खूप बेशिस्त, गुंडगिरी, भाईगिरी, मारामाऱ्या करणारे आहेत. त्यांच्याजवळ चाकू व इतर हत्यारे असतात आणि ते सदैव दहशतीचे वातावरण निर्माण करत असतात. महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी असल्यामुळे ही सारी भांडणे सोडवावी लागतात. प्रसंगी पोलीस स्टेशनला सुद्धा जावे लागते. गुंड पोरांना असे वाटू नये की जनरल सेक्रेटरी हा कमकुवत आणि घाबरट आहे. त्यामुळे त्यांच्यावर वचक असावा म्हणून त्यांना फक्त घाबरवण्यासाठी चाकू मला बाळगावा लागतो असे त्यांनी सांगितले. कशालाही न घाबरता, जसाच तसे या म्हणीप्रमाणे प्रसंगी धाडसाने वागणे हा त्यांच्या स्वभावाचा एक पैलू आहे. त्यांच्यामुळे पुढे महाविद्यालयात असे वातावरण निर्माण झाले की, भांडणे बंद होऊन सर्वांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण झाले.

बीई झाल्यानंतर एमईच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने त्यांना सांगली येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाला, शिवाय दर महिन्याला दोन हजार दोनशे रुपये शिष्यवृत्ती देखील मंजूर झाली. सांगली येथे हा अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना त्यांनी गव्हर्मेंट पॉलीटेक्निक श्रेणी एक, मुंबई टेलिफोन महानगर निगम, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, लेफ्टनंट ईन आर्मी, मुंबई महानगरपालिका या सर्व श्रेणी एक अधिकाऱ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षा दिल्या. या सर्व परीक्षांमध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले. आणि सर्वच ठिकाणी त्यांना नोकरीसाठी बोलावणे देखील आले. शेवटी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता श्रेणी एकची नोकरी स्वीकारली. प्रारंभी त्यांनी नंदुरबार इथे नोकरी केल्यानंतर तळोदा, नाशिक, इगतपुरी, अहमदनगर या ठिकाणी त्यांनी सेवा केली. आपल्यावर जी काही जबाबदारी सोपवली गेली ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आणि कर्तव्य दक्षता सिद्ध करणे हा त्यांच्या स्वभाव धर्म असल्यामुळे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची मर्जी जिंकणे त्यांना सहज शक्य झाले. माणसापेक्षा माणसाचे काम सर्वांना प्रिय असते आणि हे वतनकुमार मगरे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. कोणावरही विसंबून न राहता आपल्या कामाला लागणे हे त्यांचा रोमारोमात भिनले आहे. आणि त्यामुळेच त्यांनी सर्वच क्षेत्रात यश मिळवले आहे.

आतापर्यंतच्या सेवाकाळात वतनकुमार मगरे यांच्यावर अनेक संकटे आलीत मात्र त्यांनी सर्व संकटांवर आपल्या संयमाने, धैर्याने मात केली. कार्यकुशलता, कार्यकत्परता, मनमिळाऊ स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती, अडचणीच्या वेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून गरजू लोकांना मदत करण्याची वृत्ती या सर्व गुणांमुळे ते ज्या-ज्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणी त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक कार्यालयीन कर्मचाऱ्यांना नेहमीच हवेहवेसे झालेत आणि आपल्या विशिष्ट स्वभावाच्या कायमचा ठसा उमटवला. वतनकुमार मगरे हे वामनराव मगरे यांचे चिरंजीव आहेत, वामनराव मगरे यांनी देखील जवळपास ३० वर्षापेक्षा अधिकचा काळ समाजकार्य केले. समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मानणारे ते होते आणि तोच वारसा वतनकुमार मगरे यांनी पुढे चालवला आहे. तोंडाने बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्य करून दाखवने हीच खरी समाजसेवा आहे असे ते म्हणतात. आजकाल बऱ्याच श्रीमंत लोकांना दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा होत नाही, अशा परिस्थितीत अहोरात्र मेहनत करून कमावलेले लाखो रुपये समाजकार्यात लावणारे दानशूर स्वर्गीय वामनराव देवचंद मगरे व वतनकुमार वामनराव मगरे हे लोकांमध्ये एक आगळेवेगळे आणि विरळ पिता पुत्राची जोडी आहे. स्वतःच्या प्रगतीच्या आधी ते भावंडाच्या प्रगतीची काळजी घेणारे आहेत. स्वतःच्या प्रगतीसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी जीवन कसे जगावे याच्या आदर्श त्यांनी घालून दिला आहे आणि हे त्यांच्या संपर्कात आल्यावरचं कळते. स्वकष्टाने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणारे, कोणत्याही प्रकारच्या मोठेपणा न मिरवता सामान्य माणसात मिसळणारे आणि विविध गुणांनी संपन्न अशा वतनकुमार मगरे यांच्यासारखे व्यक्तिमत्व आजच्या सोशल मीडियाच्या युगात दृष्टीप्रथास पडणे दुरापास्त झाले आहे असेच म्हणावे लागेल.

चौकट
जीवनातील परमोच्च आनंदाचे क्षण :
● महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन १९९४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी - १ या पदावर नियुक्ती.
● मार्गप्रकल्प उपविभागात काम करीत असताना १९९८ मध्ये हातोडा पुलाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे काम करून आराखडा मंजूर केला.
● अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील होराफडी येथे २००१ साली रस्ता तयार केला. त्याठिकाणी सर्वप्रथम शासकीय वाहन पोहोचण्याच्या आनंद अविस्मरणीय होता.
● सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे बाधित झालेल्या सावऱ्यादिगर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम २०१३ रोजी सुरू केले.
● पुतणी पायल चे लग्न स्वतः उभारलेल्या वामनराव बापूजी मंगल कार्यालयात थाटात लावून दिले.
● तळोदा परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या कॉलेज ट्रस्टला ११ लाख, ११ हजार, १११ रुपयांची भरीव अशी देणगी दिली.
● सहा जुलै २०२४ रोजी त्यांची कॉलेज ट्रस्ट येथे संचालक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
● देव मोगरा विद्या प्रसारक संस्थेच्या करारनामा १६ मे २०१४ रोजी केला.
● तळोद्यातील आर्ट्स अँड कॉमर्स ट्रस्ट या न्यासाचा तहहयात, वंश परंपरागत विश्वस्तपदी नियुक्ती झाली.

सध्या राबवित असलेले प्रकल्प :
मनरमा नगर, कीर्ती नगर, वामनराव बापूजी नगर, मनोकिरण नगर, सर्वेश नगर, गोदावरी नगर तसेच वामनराव बापूजी मंगल कार्यालय व मनोरमा वामनराव मगरे शैक्षणिक संकुल.
                                                                                                          भविष्यातील ध्येय व उद्दिष्टे (स्वप्न)
           तळोदा येथे स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास केंद्र सुरू करणे, तळोदा येथे पॉलीटेक्निक, इंजीनियरिंग, शिक्षण शास्त्र, वैद्यकीय,विधी महाविद्यालय व इतर अनुषंगिक उच्च शिक्षणाची महाविद्यालये सुरू करणेसाठी प्रयत्नशील राहणे,तळोद्यात एक मोठा मॉल तयार करणे जिथे विविध स्वरूपाच्या वस्तू माफक दरात मिळतील.तळोद्याच्या विकासासाठी मग ते रस्ते असो शालेय इमारती असो किंवा तळोदेकरांच्या हिताच्या दृष्टीच्या गोष्टी असो यात तन-मन-धनाने प्रयत्न करून बदल घडवून आणणे. शेतीपूरक उद्योगांचा विकास करणे. व्यसनमुक्ती केंद्र उभारणे, अध्यात्मिक प्रगतीसाठी अभ्यासकेंद्र निर्माण करणे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, विधवाश्रम,निर्माण करून गोरगरिबांची व पिडीतांची सेवा करणे..


मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

दीपिका नितीन शिंदे यांची स्वप्नपूर्ती – संघर्षातून उभारलेले एक घर

"आपल्या जीवनातील संघर्ष आणि आव्हाने आपल्या धैर्याची, निष्ठेची, आणि प्रेमाची खरी कसोटी पाहतात." माणसाच्या जीवनातील महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या कुटुंबाचे रक्षण, प्रेम, आणि त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. कधी परिस्थिती हाताशी येते, तर कधी केवळ जिद्दीच्या जोरावर जीवनाची दिशा बदलता येते.   
    दीपिका नितीन शिंदे यांचे जीवन अशाच संघर्षांची कथा सांगते. कठीण परिस्थितीतही तिने कधी हार मानली नाही आणि आपली जबाबदारी निभावली. मात्र, कधी कधी माणसाला आपल्या कुटुंबीयांकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून आधाराची गरज असते. अशीच भूमिका मी (सुधाकर मराठे) यांने निभावली, जिथे त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आधारही दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे दीपिकाच्या आयुष्यातील एक मोठे स्वप्न पूर्ण झाले – आपले हक्काचे घर! या कार्यातून फक्त घरच नव्हे, तर एका निष्ठावान, प्रेमळ नात्याची पुनर्स्थापना झाली, ज्यामुळे फक्त एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उजळले. ही कहाणी केवळ एक संघर्षमय प्रवास नव्हे, तर त्यातून मिळालेल्या प्रेरणांची आणि नात्यांतून उमललेल्या माणुसकीची आहे.
परिस्थिती आणि नैतिक जबाबदारी
             दीपिका नितीन शिंदे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी कधीही हार मानली नाही. संकटांना तोंड देत त्यांनी आपले जीवन जगले. तिला घर बांधून देण्याचा निर्णय सुधाकर मराठे यांनी घेतला, ज्यामुळे तिच्या भविष्याला स्थैर्य मिळाले. घर बांधण्याचा निर्णय हा फक्त कर्तव्य नव्हता, तर लहान भाऊ म्हणून जपलेल्या निष्ठेचा आणि माणुसकीचा सन्मान होता.
जागा निवड व घरकुल योजना मंजुरी
          नंदूरबारमधील शिरीष कुमार नगर येथील प्लॉट, जो नितीन शिंदे यांच्या दाजींनी गुंतवून ठेवला होता, तिथे घर बांधण्याचे ठरले. 2022 साली सुधाकर मराठे यांचे मित्र, नंदूरबारचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या सहकार्याने घरकुल योजनेची मंजुरी मिळाली. पालिका कर्मचारी गौरव पाटील यांनी तातडीने पहिला हप्ता खात्यात वर्ग केल्याने कामाला गती मिळाली.
ठेकेदार आणि बांधकाम
           घर बांधण्याची जबाबदारी श्री. वासुदेव कदमबांडे यांनी घेतली. सुधाकर मराठे यांच्या व्यक्तिगत लक्षामुळे घराचा सुंदरसा प्लॅन तयार करण्यात आला. साधारण 500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घरात दोन खोल्या आणि पारस बागेसाठी जागा ठेवण्यात आली. श्री. कदमबांडे यांनी "ना नफा, ना तोटा" तत्त्वावर काम केले. कामाचे व्यवस्थापन, घराच्या लहान-मोठ्या बाबींचे बारकाईने निरीक्षण, यासाठी सुधाकर मराठे यांनी संपूर्ण वेळ दिला.
खर्च आणि बांधकाम पूर्णता
                 घर बांधण्यासाठी साधारण 8 लाख रुपये खर्च आला. घरकुल योजनेची काही रक्कम वगळता संपूर्ण खर्च सुधाकर मराठे यांनी उचलला. 2024 साली घर बांधून पूर्ण झाले आणि गृहप्रवेश सोहळा साजरा करण्यात आला. घरभरणीचे कार्य अत्यंत नियोजनबद्ध झाले, ज्यामध्ये तळोदा येथून बांधकाम कारागीर, पुट्टी व रंगकाम करणारे कारागीर आणि स्वयंपाकासाठी ब्राह्मण आणण्यात आले.
प्लॉटच्या नोंदी व शिक्षणाची जबाबदारी
            भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून घर बांधलेला प्लॉट दीपिका नितीन शिंदे यांच्या नावावर केला गेला. त्यांच्या मुलीची म्हणजेच स्वामिनी नितीन शिंदे या भाचीचे शिक्षण 12 वीपर्यंत तळोदा येथेच पूर्ण करण्यात आले. यासोबतच तिच्या मुलासाठीही व्यावसायिक व्यवस्थेचा विचार करण्यात आला.
                         ही कहाणी फक्त दीपिका नितीन शिंदे यांच्या स्वप्नपूर्तिची नाही, तर संघर्षातून नातेवाईकांनी दिलेल्या पाठिंब्याने उभारलेल्या एका कुटुंबाच्या पुनरुत्थानाची आहे. सुधाकर मराठे यांचे हे कार्य त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही एक आदर्श आहे.
"आपल्या कुटुंबातील गरजू व्यक्तींना मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे," हा संदेश देत त्यांनी एक चिरंतन उदाहरण घालून दिले आहे.

सोमवार, २४ जून, २०२४

संघर्षातून समाजसेवेपर्यंत: योगेश मराठे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

तळोदा : काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या मनात कायमची जागा मिळवतात. त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे, स्पष्टवक्तेपणामुळे, आणि त्यांच्या बोलण्यातून येणाऱ्या सहज हास्यामुळे ते कोणालाही आपलंसं करून घेतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे योगेश शांताराम मराठे. त्यांचा जीवनप्रवास, त्यांची कर्तृत्व गाथा आणि समाजातील त्यांची ओळख याची नोंद घेणे हा खरं तर समाजासाठी गौरवाची गोष्ट आहे. योगेशभाईंच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा संघर्ष, मेहनत, आणि निस्वार्थ समाजसेवेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांचं आयुष्य म्हणजे साधेपणा, कष्ट, आणि माणूसकीचं जिवंत उदाहरण आहे.

        योगेश मराठे यांचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील देवगाव. हे गाव छोटं, पण योगेश यांचं बालपण मात्र मोठ्या संघर्षांनी भरलेलं होतं. घरची परिस्थिती तशी बेताची होती. लहान वयातच गरिबीचे चटके सोसावे लागले. घरातील अडचणी, आर्थिक अडसर, आणि जीवनातील कठीण परिस्थिती यांच्याशी त्यांनी लहान वयातच सामना करायला सुरुवात केली. पण या अडचणींनी त्यांना कधीच मोडून टाकलं नाही. उलट, या सगळ्या संकटांनी त्यांना अधिक कणखर, अधिक जिद्दी बनवलं. लहान वयातच मेहनतीची किंमत कळली. त्यातूनच पुढे त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांना मिळालेलं शिक्षण मर्यादित होतं, पण जीवनानं त्यांना शिकवलं ते जगण्याचं खरे धडे.
         योगेश भाऊंनी विविध व्यवसायात आपले हात आजमावले. सुरुवातीला छोट्या-मोठ्या उद्योगांतून स्वतःला आर्थिकदृष्ट्या उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी किरकोळ व्यापार, छोटे-छोटे व्यवसाय, आणि अनेक धंद्यांमध्ये नशीब आजमावले. प्रत्येक व्यवसायातून नवा अनुभव घेत, अडचणींचा सामना करत, त्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवली. व्यवसाय करताना त्यांना अनेकदा अपयशही मिळालं, पण कधीच हार मानली नाही. मनात अपार जिद्द आणि प्रचंड मेहनतीची तयारी होती. त्या जोरावर ते पुढे जात राहिले. जीवनातला हा संघर्ष त्यांना नेहमीच अधिक मजबूत करत राहिला. अनेकदा नशिबाने पाठ फिरवली, पण त्यांनी नशिबावर कधी विश्वास ठेवला नाही, काहीतरी करत रहावे प्रयत्न सुरू ठेवावे काहींना काही मार्ग निघताच असे ते नेहमी म्हणत, 

        तळोदा शहरातील माजी नगराध्यक्ष भरतभाई माळी यांच्या नेतृत्वात आणि संजय माळी यांच्या मार्गदर्शनात, योगेशभाईंनी 'गणेश सोशल ग्रुप'च्या माध्यमातून समाजकार्यास सुरुवात केली. प्रारंभी हा एक छोटा प्रयत्न होता, पण हळूहळू त्यांनी समाजकार्यात आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. गरजूंसाठी मदत, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरं, आणि समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवून त्यांनी तळोदा शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कामाची दखल घेत अनेक लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. त्यांच्या विनम्रतेने आणि मनमिळावूपणाने त्यांची लोकप्रियता वाढत गेली.

     समाजकार्यासोबतच योगेश मराठे यांना राजकारणाची ओढ निर्माण झाली. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुरुवातीला विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर शहर अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्ष संघटना बळकट केली. काँग्रेस पक्षात कार्यरत असताना त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न उचलले. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना पक्षात आणि समाजात दोन्हीकडे मान मिळाला. त्यांनी पक्षासाठी झोकून देऊन काम केलं आणि लोकांमध्ये आपली जागा पक्की केली.

       योगेशभाईंच्या राजकीय प्रवासात त्यांचे जिवलग मित्र हितेंद्र क्षत्रिय आणि संदीप परदेशी यांची मोलाची साथ मिळाली. या त्रिकुटाने पुढे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या तिघांनी मिळून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली. स्थानिक पातळीवर पक्षाला नवी ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे त्यांनी राजकीय व सामाजिक कार्य करताना कधीही मतभेदांच्या राजकारणात स्वतःला गुंतवलं नाही. त्यांची काम करण्याची पद्धत कायम सकारात्मक, लोकाभिमुख, आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारी होती. पक्ष बदलला तरी त्यांची लोकांसाठी झटण्याची वृत्ती मात्र कायम आहे.

        योगेश मराठे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा म्हणजे समाजासाठी त्यांची निस्वार्थ भावना. ते कोणालाही मदत करताना कधीही मोठेपणा दाखवत नाहीत. त्यांच्या मदतीमुळे अनेक गरजूंचे प्रश्न सोडवले गेले. मराठा समाजाचे तळोदा शहरातील युवा नेतृत्व, छत्रपती शिवाजी महाराज शिव स्मारक समितीचे अध्यक्ष पदी आहेत. विशेषत: त्यांची एक प्रेरणादायी परंपरा म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून दर वाढदिवसाला ११,००० रुपयांची देणगी समाजकार्याकरिता देणं. काही लोक वाढदिवस साजरे करतात, पण योगेशभाई वाढदिवस समाजासाठी काहीतरी देण्याची संधी मानतात. हा त्यांचा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून अखंडित सुरू आहे. याशिवाय आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त योगेश मराठे यांच्या पुढाकाराने तळोद्यात समाजोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. चर्मकार समाजाला १० खुर्च्या व २ मॅट, मातंग समाजाला १० खुर्च्या व २ मॅट तसेच कुकरमुंडा येथील इस्कॉन मंदिराला गाद्या व मॅट प्रदान करण्यात आले. खर्च टाळत समाजासाठी उपयुक्त वस्तू देत मराठे यांनी समाजसेवेची आदर्श दिशा दिली. यातून त्यांची समाजाबद्दलची बांधिलकी, जबाबदारी आणि निस्वार्थीपणा दिसून येतो. 
        योगेश मराठे यांनी केवळ समाजासाठीच नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या भाऊ सुधाकर मराठे यांना नोकरी मिळवून देण्यात त्यांचे मोठे सहकार्य आहे. सुधाकर यास योग्य मार्गदर्शन, आधार आणि संधी मिळवून देत त्यांनी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं. आज सुधाकर मराठे यांची ओळख समाजात चांगली आहे, याचं श्रेय योगेशभाईंना मोठ्या प्रमाणात जातं. त्यांनी संपूर्ण कुटुंबाला सावरण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मदतीचा हात दिला आहे आणि आज त्यांच्या कुटुंबाची प्रगती साधली आहे.. 
        आज योगेशभाई आम. राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात सक्रिय राजकारण करत आहेत. पक्ष बदलला, पण समाजकार्याची दिशा आणि लोकांसाठी काम करण्याची वृत्ती तशीच आहे. पक्षीय राजकारण कितीही असलं तरी योगेशभाईंसाठी माणूस महत्त्वाचा आहे. ते राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करणं हेच आपलं कर्तव्य मानतात. पक्ष बदलला पण माणसं जोडण्याची आणि त्यांच्यासाठी निस्वार्थ झटण्याची वृत्ती कायम राहिली आहे. ते आजही तळोदा परिसरात आपली वेगळी ओळख जपून आहेत.
       योगेशभाई जे मनात असतं तेच थेट बोलतात. त्यांच्या बोलण्यात नेहमीच हास्य मिसळलेलं असतं. कठीण परिस्थितीतसुद्धा ते हलकंफुलकं वातावरण निर्माण करतात. त्यांचं मन अत्यंत निस्वार्थी, साधं आणि कोणताही दिखावा न करणारा आहे. कुटुंबासाठी त्यांनी नेहमी खंबीर पाठींबा दिला आहे. राजकारण, समाजकारण, किंवा व्यक्तिगत नातं – ते माणसं जोडतात, तोडत नाहीत. योगेश मराठे यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा संघर्ष, मेहनत, निस्वार्थ समाजसेवा आणि राजकीय प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण आहे. ते आज ज्या ठिकाणी पोहोचले आहेत, ते त्यांच्या अपार मेहनतीचा आणि लोकांना दिलेल्या निस्वार्थ प्रेमाचा परिणाम आहे.        
  योगेशभाईंसारख्या निस्वार्थी व्यक्तिमत्त्वाची उपस्थिती म्हणजे एक सकारात्मक आशेचा किरण आहे. ईश्वरचरणी प्रार्थना की त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि समाजसेवेची अजून मोठी संधी लाभो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा योगेशभाई!....

सोमवार, १० जून, २०२४

आमचे घर : आठवणींचा ठेवा, कष्टांचा वारसा आणि जीवनप्रवासाचा साक्षीदार

                  हे खरं तर आम्ही आमच्या मामाचे घर म्हणतो; पण आम्हाला मामा नव्हते. हे घर आमच्या आजी स्व. नबाबाई संपत मराठे यांचे होते. त्यामुळे या घराशी आमच्या कुटुंबाचे अतूट नाते जोडले गेले. आमची आई आशाबाई शांताराम मराठे ही स्व.संपत मराठे व स्व.नाबाबाई मराठे यांची नवसाची एकुलती एक मुलगी होती. आमचे आजोबा स्व. संपत मराठे यांचे निधन झाले तेव्हा त्या काळात संपर्काची साधने कमी होती. मुलीला ही दुःखद बातमी वेळेवर मिळाली नाही. तब्बल दहा दिवसांनी तिला ही गोष्ट कळली. त्या प्रसंगामुळे आजीने आपल्या मुलीला, म्हणजेच आमच्या आईला, कायम आपल्या जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला.  
      आमचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील देवगाव. तेथे आमची वडिलोपार्जित शेती होती. त्या काळी ग्रामीण भागात उद्योगधंदे किंवा रोजगाराच्या संधी फारशा नव्हत्या. शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने माझे वडील शांताराम वेडू मराठे आणि आई सौ. आशाबाई मराठे यांनी तळोदा येथे येऊन संसाराची नवी सुरुवात केली..
           याठिकाणी सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते. वडिलांनी लॉरीवर भाजीपाल्या विक्री करून पाहिली, त्यानंतर ते गल्लोगल्ली फिरून बर्फाचा गोला विकू लागले. मी लहान असताना त्यांच्या लॉरीवर बसून "गोला वाले, भाजी वाले!" अशी आरोळी मारत फिरलो आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाची जाण आहे. सकाळी गोला किंवा भाजलेल्या आणि सायंकाळी बाफलेल्या शेंगा विकणे, ती आठवण आजही मनात ताजी आहे.
           फक्त वडीलच नव्हे तर आईनेही संसार उभा करण्यासाठी खूप मेहनत घेतली. वडिलांना मदत करणेसोबतच बाजारात मठ आणि पापडी विकणे अशा अनेक कामांमध्ये तिने सहभाग घेतला. आमची आजी देखील जिल्हा परिषद शाळेवर गोळ्या बिस्कीट विक्री करत होती त्यांच्या सर्वांच्या कष्टामुळेच आमचा संसार हळूहळू मार्गी लागला.      
          या सर्व काळात आमची आजी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिच्यामुळे आम्हाला राहण्यासाठी हे जुने घर मिळाले. हे घर फक्त विटा आणि मातीचे बांधकाम नव्हते; ते आमच्या आयुष्याचा आधार होते. या घरात आणखी एक वाटा होता तो म्हणजे आमचे आजोबा आजीचे लहान बंधू स्व.ओंकार शंकर मराठे यांचा त्यांनी ही मरणापूर्वीच आपण ही जागा माझ्याकडून घ्या असे म्हणून प्रेम व्यक्त केले.
         या घरात आमच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. चार भावंडे, आई-वडील आणि आजी अशा मोठ्या कुटुंबाचा आनंद, गप्पा, हशा, सण-उत्सव आणि लहानसहान भांडणे या सर्वांचे हे घर साक्षीदार आहे. आमच्या बालपणातील प्रत्येक क्षण या घराच्या भिंतींमध्ये आजही जिवंत आहे.
            विशेष म्हणजे आमच्या चारही भावंडांचे विवाह याच घरातून झाले. त्यामुळे या घराचे आमच्या आयुष्यातील स्थान आणखी मोठे आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, घरे बदलली; पण या घराशी जोडलेल्या आठवणी मात्र आजही तितक्याच जिवंत आहेत.
        आज जेव्हा या जुन्या घराकडे पाहतो, तेव्हा आजीचे प्रेम, आई-वडिलांचे अथक कष्ट आणि आमच्या बालपणातील सुंदर क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ एक वास्तू नसून आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, प्रेम, त्याग आणि जिव्हाळ्याचे जिवंत स्मारक आहे. हे घर आमच्या आठवणींचा अमूल्य ठेवा आहे. 
          कालांतराने आई-वडिलांच्या अथक परिश्रमातून या जुन्या कवलारू घराचे रूपांतर पत्र्याच्या घरात झाले. संसाराची घडी हळूहळू स्थिरावत गेली आणि घरालाही नवे रूप मिळाले. पुढे मला देखील या घरासाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे. मी या घराचे रूपांतर दुमजली, टुमदार आणि सुबक अशा घरात करण्याचा निर्णय घेतला आहे. घराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. नवीन बांधकाम, नवीन सुविधा आणि नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे.
       मात्र घराचे रूप बदलणार असले तरी त्याच्या जुन्या आठवणी मात्र ताज्याच राहतील यात शंका नाही, त्या मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, अंगणातील खेळ, आई-वडिलांचे कष्ट, आजीचे प्रेम, भावंडांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आणि घरभर घुमणारा हशा आजही मनात जिवंत आहे. नवीन घर उभे राहील, काळ पुढे जाईल, पण जुन्या घराने दिलेली ऊब, आपुलकी आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या आयुष्याच्या आठवणी कधीही विसरता येणार नाहीत.
       आज या घराकडे पाहताना अभिमान वाटतो की आई-वडिलांनी कष्टाने सुरू केलेला प्रवास पुढे नेण्याचे भाग्य मला लाभले. परंतु या सुंदर घराच्या पायात जुन्या घराच्या आठवणींचीच मजबूत वीट रचलेली आहे. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून, आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, जिद्द, प्रेम आणि एकोप्याची जिवंत कहाणी आहे....