Breking News

गुरुवार, २२ मार्च, २०१८

गरोदर माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी 'खुशहाली ॲप' ठरतेय् वरदान अतिदुर्गम भागातील धडगाव व तळोदा तालुक्यात पोहोचले 'अरमान'

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात गरोदर माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
यावर मात करण्यासाठी शासन व प्रशासन पराकोटीचे प्रयत्न करीत आहेत. त्यातच आता प्रशासनाच्या प्रयत्नांना जोड मिळाली आहे ती एम खुशहाली ॲपची! शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी अरमान व टाटा ट्रस्ट यांचामार्फत 'एम खुशहाली ॲप' तयार करण्यात आले असून या माध्यमातून ५३४८ गरोदर माता व १४९१ बाळाची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी २३३८ माता आणि २३२ बाळांना या माध्यमातून सेवा पुरविण्यात आली आहे. एक सक्षम पाऊल माता व बाळ मृत्यू कमी करण्यासाठी 'अरमान'तर्फे उचलण्यात आले आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील गरोदर मातांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत आहे.. नंदुरबार जिल्ह्यात माता व बाळ मृत्यू कमी व्हावे याकरिता अरमान या संस्थेने एम खुशहाली ॲप तयार केले असून या माध्यमातून बालमृत्यू व गरोदर माता मृत्यूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर प्रकल्पास टाटा ट्रस्टतर्फे वित्तीय सहाय्यता केली जात असून जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पाची अंमलबजावणी धडगाव व तळोदा तालुक्यात प्रायोगिक तत्वावर केली जात आहे. यात तळोदा तालुक्यात प्रतापपूर, सोमावल, बोरद, वाल्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर धडगाव तालुक्यातील बिलगाव व चुलवड या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण १५१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर उपक्रमासाठी ३७ परिचारिकाना भ्रमणध्वनी वितरीत करण्यात आले आहेत. या माध्यमातून योग्य जोडपे, त्यांच्या वयातील अंतर, रक्तगट, गर्भवती महिला व बाळाबाबतची संपूर्ण माहिती मोबाईलद्वारे ॲपमध्ये लोड करण्यात येते. सदर संकलित माहिती आरोग्यविभाग व अरमान यंत्रणेच्या बोर्डवर उपलब्ध होते. त्यामुळे स्वयंचलित पद्धतीने महिलेचे वय, अपेक्षित प्रसूती तारीख तसेच कृती आराखडा देय भेटी, भेटीचे नियोजन कार्यबद्ध स्वरुपात करता येते. नोंदणी झालेल्या बाळ आणि गर्भवती महिलांना टॅबलेटच्या सहाय्याने विविध ॲनिमेशन दाखवून बाल संगोपन, लसीकरण, आहार, ॲनेमिया, स्तनपान, धोकादायक आरोग्य चिन्हे, प्रसूती, डायरिया, कुटुंब नियोजन, एच.आय.व्ही.. बाबत मार्गदर्शनासोबत जनजागृती केली जात आहे. अतिदक्षतेच्या मातांना मोबाईलच्या माध्यमातून तात्काळ वैद्यकीय सुविधाही पुरविल्या जात आहेत. या उपक्रमातंर्गत ५३४८ गरोदर माता व १४९१ बाळाची नोंदणी करण्यात आलेली असून २३३८ महिलांच्या आणि २३२ बाळांना सेवा पुरविण्यात आली आहे. संबधित प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिचारिकांच्या मदतीने संस्था हे मिशन राबवित आहे. हे मिशन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सी.ओ. कार्ल परेरा, प्रकल्प व्यवस्थापक आशिष भोसले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन बोडके, टाटा ट्रस्टच्या स्मृती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली टीम प्रकल्प समन्वयक निलचंद्र शेंडे व त्यांची टीम मेहनत घेत असून तळोदा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, धडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश बडे, डॉ. रेखा शिंदे, डॉ. कांतीलाल पावरा, डॉ. सोहम पाडवी, डॉ. साईिसंग पावरा, डॉ. विनोद, डॉ.जोशी, डॉ. निर्मल जगदाळे, डॉ. राठोड, डॉ.लांडे, डॉ. प्रशांत हिंगणकर यांचे सहकार्य लाभत आहे..

अरमान व टाटा संस्थेच्या विद्यमाने राबविला जात असलेला सदर उपक्रम हा दुर्गम व अतिदुर्गम भागात महत्वाचा ठरत आहे. या माध्यमातून आरोग्य विभागाला अतिदक्षतेच्या गर्भवती महिला तात्काळ कळण्यास मदत होत आहे. ॲनिमेशनच्या माध्यमातून केलेले समुपदेशन हे महिलांना समजण्यास सोपे आहे. सदर उपक्रमामुळे माता व बाळ मृत्यू कमी करण्यास हातभार लागत आहे. . -महेंद्र चव्हाण . तालुका वैद्यकीय अधिकारी, तळोदा.















  

बुधवार, ७ मार्च, २०१८

जेव्हा डॉक्टर देवदूत होतात!

धुळ्याचे डॉ.राहूल भामरेंनी दिले महिलेला जीवदान
तळोदा तालुक्यातील बोरद येथील एका महिलेस किडनीनजीक गाठ असल्याने त्यांना कुटुंबियांनी महाराष्ट्र व गुजरात मधील किडनी उपचार होत असलेल्या रुग्णालयात नेले होते. मात्र, सदर गाठ काढतांना शस्त्रक्रिया करावी लागणार असून यात किमान ६० ते ७० टक्के किडनी डॅमेज होण्याची शक्यता तेथील डॉक्टरांनी बोलून दाखविली. यामुळे नेमके काय करावे या विवंचनेत कुटुंबिय पडले होते. यावेळी धुळे येथील राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ.राहूल भामरे यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्यातील तज्ञ डॉ.सुभाष भामरे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स करून त्यांचा सल्ला घेऊन आपल्या
हॉस्पिटलमध्ये सदरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. किडनीला कोणतीही इजा न होऊ देता डॉ.भामरे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने डॉक्टरला खरच परमेश्वराचाच अवतार का म्हणतात, आम्हाला देवदूतच भेटला अशी भावना रुग्ण महिला व त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. . तळोदा तालुक्यातील बोरद येथील मनिषा दत्तात्रय पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना नंदुरबार येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, योग्य निदान न झाल्याने धुळे येथे राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ.राहुल भामरे यांच्याकडे उपचारसाठी दाखल केले. यावेळी मनिषा पाटील यांच्या किडनीला लागूनच गाठ असल्याचे निदर्शनास आले. यावरत्यांचे पती दत्तात्रय पाटील यांनी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले व मुंबई, बडोदा, नडीयाद येथील किडनीतज्ञांकडे धाव घेतली. गाठीवर ६ सेमीचे फेरी नेफ्रिक मास्क असून गाठ मोठे आतडे व किडनीच्या मध्यभागी असल्याने शस्त्रक्रिया केल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता तेथील तज्ञ डॉक्टरांनी वर्तविली. काही केल्या किडनी निकामी होणारच या भितीने पाटील कुटूंबिय भयभीत झाले. त्यातच राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ.राहुल भामरे यांनी दत्तात्रय पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शस्त्रक्रियेसाठी येण्यास सांगितले. कोणतीही इजा न होऊ देता शस्त्रक्रिया शक्य असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितल्यानंतर दत्तात्रय पाटील यांनी शस्त्रक्रियेसाठी होकार दिला. सदर शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी प्रगत तंत्रज्ञानामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सल्ल्यामुळे व डॉ.राहूल भामरे, डॉ.भूषण वाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी तीन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर किडनीला कोणतीही इजा न होता यशस्वी केली. यामुळे डॉ.राहूल भामरे यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. डॉक्टर नव्हे तर देवदूत आम्हाला भेटले, अशी प्रतिक्रिया रुग्ण महिला व त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखविली..





गुरुवार, १ मार्च, २०१८

दिव्यांग प्रवाशाचा नाशिक ते निजामपूर ताटकळत प्रवास!

 आरक्षित आसन मिळेना! : महामंडळाने वाहकांना सूचना देण्याची मागणी
 दिव्यांगांसाठी एसटी बसमध्ये जागा आरक्षित असतांना देखील बसण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे दिव्यांगांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्य परिवहन महामंडळाने वाहकांना सूचना देवून आरक्षित जागा दिव्यांग प्रवाश्यांना उपलब्ध करुन द्यावी, अशी अपेक्षा तळोदा येथील अपंग शिक्षक विनोद पगार यांनी दै.'पुण्यनगरी'शी बोलतांना व्यक्त केली आहे.. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिला, अपंग, विद्यार्थिनी, दिव्यांग, पत्रकार, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरक्षण असते. खिडकीजवळ किंवा आसनाच्या पाठीमागे आसन राखीव असल्याचे लिहिले जाते. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जो पहिल्यांदा सीट पकडेल तोच तेथे बसून प्रवास करतो. यामुळे महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थिनींना उभे राहून किंवा चालकाच्या केबिनमध्ये बसून प्रवास करावा लागत आहे. या बसेसमधील आरक्षण केवळ नावालाच असल्याचा आरोप करत आपल्या सोबत घडलेला प्रसंग त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केला. तसेच दै.'पुण्यनगरी'शी याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. सकाळी ११ वाजेदरम्यान नाशिकहुन नंदुरबार येथे येण्यासाठी त्यांनी बीटी- १४, 3447 या क्रमांकाची बस गाठली. बस लांब पल्याची असल्याने प्रवाश्यांनी तुडूंब भरलेली होती. मात्र महत्त्वाचे काम असल्याने याच बसने शिक्षक पगारे यांना जावे लागणार होते. लांबचा प्रवास व अपंग असल्याने शिक्षकास प्रवास करणे जिकरीचे ठरणार होते. मात्र आपण अपंग आहोत, त्यासाठी शासनाकडून आरक्षित आसन असल्याने ती मिळवू असा मनात विचार करत त्यांनी प्रवास सुरु केला. त्यांनी याकरिता वाहकाला विनंती करून दोन नंबरचेआसन अंपंगासाठी राखीव असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रवास लांबचा असल्याने एवढ्या लांबपर्यंत उभे राहणे शक्य नसल्याचे कारण देखील त्यांनी सांगितले. मात्र मी त्यांना त्या जागेवरुन उठवू शकत नाही. ते नाशिकहून बसले असल्याचे म्हणत तुम्हीच त्यांना उठवा, असे म्हणत वाहकाने हात झटकले. शेवटी दिव्यांग असलेले पगारे यांना नाशिक ते निजामपूरपर्यंतचा प्रवास उभे राहून करावा लागला. दरम्यान वाहकाकडून अशी वागणूक मिळाल्याने अपंग शिक्षक पगार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य परिवहन महामंडळाने वाहकांना सूचना देवून आरक्षित जागा अपंग प्रवाश्यांना उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा अपंग शिक्षक पगार यांनी व्यक्त केली आहे..


मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

नवाब मलिकांविरोधात तळोदा न्यायालयात तक्रार!

ना.रावलांची बदनामी प्रकरण : श्यामसिंग राजपूत यांची पत्रकार परिषदेत माहिती सरकारी प्रकल्प जाहीर झालेल्या गावातील जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन सरकारला त्या वाढीव किमतीला विकण्याचा आरोप करीत भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात तळोदा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष श्यामसिंग राजपूत यांनी दिली. . नवाब मलिक यांनी कोणतीही खातरजमा न करता खालच्या पातळीवर जाऊन पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच भारतीय जनता पार्टीवर आरोप केले होते. धर्मा मंगा पाटील यांच्या मृत्यूनंतर जयकुमार रावल व पक्षाला बदनाम करण्याच्या उद्देशाने व राजकीय प्रतिष्ठा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आले. ना.रावल यांच्यावर खोटे व तथ्यहीन व बिनबुडाचे आरोप केले आहेत. रावल कुटुंबीय धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत असून पैसे कमावण्याचा सोपा मार्ग त्यांनी अवलंबले आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक जमिनी जयकुमार रावल किंवा त्यांच्या कंपनीच्या नावे आहेत. रावल हे भूमाफिया असून त्यांनी माजी राष्ट्रपती यांची देखील जमीन बळकावली असल्याचा आरोपासह विविध आरोप पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. यामुळे जयकुमार रावल विरुद्ध केलेले आरोप हे केवळ वयक्तीक व पक्षाची बदनामी करण्याच्या हेतूने आहेत. यात केवळ त्यांची वयक्तीक व सामाजिक तसेच पक्षाची बदनामी करण्याचा हेतू असून त्यांची राजकीय प्रतिष्ठा संपवण्याच्या कट असल्याचे श्यामसिंग राजपूत यांनी यावेळी सांगितले. विरोधकांच्या केलेल्या आरोपात कुठलाही शुद्ध हेतू नाही, तसेच बिनबुडाचा आरोपामुळे संघटनेची व व्यक्तीची बदनामी झाल्याने नवाब मलिक यांच्या विरोधात वकीलांमार्फत तळोदा न्यायालयात ४९९, ५०० प्रमाणे फिर्याद नोंद करण्यात आली असल्याची माहिती श्यामसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली..

सदर प्रकरणी तळोदा न्यायालयात अर्ज क्रमांक 51/18 असा दाखल झाला आहे. दि.17 मार्च रोजी सदर प्रकरण पडताळणी कामी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची प्रथम वर्ग न्याय दण्डाधीकारी यांच्या समोर सुनावणी होणार आहे.. वकील संदीप पवार


सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

दै.'पुण्यनगरी' च्या वृत्ताने बांधकाम विभागाला आली जाग

हातोडा पुलावरील खड्ड्यांसह भगदाड बुजण्यास सुरुवात
हातोडा पुलावरील जोड रस्त्यालगत भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदर पुलाचे सहा महिन्यापुर्वी लोकार्पण होवून वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. नित्कृष्ट कामामुळे वारंवार पुलावर खड्डे, भगदाड पडत आहेत. पुलाच्या गुणवत्तेबाबत नागरीकांसह वाहनधारकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर नुकत्याच पडलेल्या भगदाडबाबत दै.'पुण्यनगरी' शनीवारच्या अंकात सचित्र बातमी प्रकाशित केली होती. या बातमीनंतर बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे व भगदाड बुजण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. . तापी नदीवरील हातोडा पुलाच्या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा पूल बांधकाम ते उद्घाटन असा सतत चर्चेंत राहिला आहे. अवघ्या सहा महिन्यात पुलाला जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान एक मोठ भगदाड पडून जोड रस्त्यादरम्यान भराव खचल्याने याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत दै.'पुण्यनगरी' सचित्र वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच बांधकाम विभाग खडबडून जागे झाले शनीवारी सकाळी जोड रस्त्यादरम्यान पडलेले भगदाड बुजण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, खचलेला भराव तसाच असून यामुळे अपघाताची शक्यता वाहनधारकांनी बोलून दाखविली आहे. .

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

हातोडा पुलाला पुन्हा पडले भगदाड

 तापी नदीवरील हातोडा पूल रहदारीसाठी सुरु होऊन अवघे सहा महिने झाले आहेत,
मात्र, पुलावरील जोड रस्त्याचा लगत एक भगदाड पडले असून ठिकठिकाणी भराव खचला आहे. यामुळे पुलाचा कामांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर अवजड वाहने यात अडकून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. . तापी नदीवरील हातोडा पुलाचे कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मागीलवर्षी काम पूर्ण झाल्यानंतर १५ आगस्ट रोजी हातोडा पुलाचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली खा.डॉ.हीना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.उदेसिंग पाडवी, आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, भरत माळी, डॉ.शशिकांत वाणी यांच्या उपस्थितीत पार पडला. हातोडा पूल बांधकाम ते उद्घाटन असा सतत चर्चेंत होता. लोकर्पणानंतरही हातोडा पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुलाला जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान एक मोठ भगदाड पडले असून भराव खचला आहे. यामुळे वाहन त्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला या पुलावरून लहान वाहनांना परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर नागरीक व विविध संघटनांच्या मागणीवरून पुलावरुन मिनीबस व स्कुल बसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली. या पुलामुळे नंदुरबारचे अंतर तळोदा, धडगाव येथून २० किमी. ने कमी झाले आहे. दरम्यान, कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या पुलावर भगदाड पडले असून भराव खचला आहे. यावरुन अवजड वाहने, रेती वाहतूकीची वाहने धावतात. जोडरस्त्या दरम्यान पडलेले भगदाड तातडीने बुजले नाही तर यात वाहने रुतून अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे..



सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

बिबट्याची मादी अन् बछड्यांची पहाटे झाली भेट!


तळोदा तालुक्यातील गुंजाळी शिवारात ऊसतोडणी करीत असतांना मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बछड्यांवर नजर ठेऊन होते. काल दि.१८ रोजी पहाटेच्या सुमारास आईपासून बिछडलेल्या मादीने आपल्या तिघा बछड्यांना घेऊन गेली आहे. . तळोदा शहरापासून १० कि.मी.अंतरावरील गुंजाळी गावात योगेश सुभाष शर्मा यांच्या शेतात ऊसतोड सुरु असतांना मजूरांना बिबट्याचे एक महिन्यांचे तीन बछडे मिळून आले. सदर घटनेची वनविभागाला माहिती मिळताच वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनपाल आर.बी.वायकर, वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक शरद मोरे, सचिन वाघ यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. ऊसतोड थांबवून परिसर मोकळा केला होता. बछड्यांना ताब्यात घेऊन त्यांची निगा राखणे, त्यांना पोषक आहार देणे कठीण होत असल्यामुळे वनविभागाने बछड्यांना ताब्यात न घेता त्याच ठिकाणी बछड्यांवर वनकर्मचारी नजर ठेऊन होते. मध्यरात्री त्या भागात पिल्लांसाठी व्याकुळ झालेली बिबट्या मादी डरकाळी फोडत पिलांना आवाज देत त्यांचा शोध घेत होती. यावेळी बछड्यांकडून प्रतिसाद मिळाल्याने काल रविवारी पहाटेच्या सुमारास बिछडलेल्या बछड्यांची बिबट्या मादीची भेट झाली. बिबट्या मादीचे आपले बछडे सोबत नेत्यांना दिसून आल्याचे वनमजूर भिमसिंग कोठारे, सुनिल वळवी, प्रताप डमकूल, जोला ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहिले. तसेच यासंदर्भात वनविभागाला कळविले. काही तासातच विभक्त झालेले बिबट्या मादी व बछड्यांची भेट झाल्याने वनविभागाने समाधान व्यक्त केले आहे..


गुंजाळी शिवारात आढळले बिबट्याचे तीन बछडे

तळोदा तालुक्यातील गुंजाळी शिवारात ऊसतोडणी करीत असतांना मजुरांला बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून या बछड्यांवर नजर ठेवून आहेत.
तळोदा शहरापासून १० किमी. अंतरावरील गुंजाळी गावात योगेश सुभाष शर्मा यांच्या शेतात ऊसतोड सुरु असतांना मजुरांना बिबट्याचे बछडे दिसून आल्याने त्यांनी शेतातूप पळ काढला. यावेळी काही मजुरांनी धाडस दाखवित शेतातून जावून पाहणी केली असता एक महिना वयाचे तीन बिबट्याचे बछडे दिसून आले. सदर घटना मजुरांनी शेत मालकाला कळविली. त्यानंतर शेतमालकाने वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनपाल आर.बी.वायकर, वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक शरद मोरे, सचिन वाघ आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ऊसतोड थांबवून परिसर मोकळा करण्यात आला. यापूर्वी
असाच शेतात आढळलेल्या बछड्याला वातावरण संतुलन व पोषण आहार यामुळे वाचविण्यात वनविभागाला अपयश आले आहे. त्यामुळे बछड्यांना ताब्यात न घेता मादी येऊन त्यांना घेऊन जाईल, यासाठी त्यांच्यावर लक्ष  ठेवण्यात येत आहे.. यापूर्वी बोरद परिसरातील गोंडाळा शिवारात दि. २४ डिसेंबर रोजी ऊसाची पाचट जाळण्यासाठी लावण्यात आलेल्या आगीत १५ दिवसाचे तीन बिबटचे पिल्लू होरपळले होते. त्यापैकी एक बछडे घेऊन जाण्यास मादीला यश आले होते. तर दोनपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक बछडे वनविभागाने ताब्यात घेतले होते. अथक प्रयत्न करूनही त्या पिल्लास वाचवण्यास अपयश आले होते. यावर्षी वनविभागाने केलेल्या प्राणी गणना दरम्यान बिबटचा उल्लेख नाही. मात्र दोन महिन्यात पुन्हा बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने या भागात एकूण बिबट्यांची संख्या किती असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुंजाळी शिवारात आढळले बिबट्याचे तीन बछडे तळोदा तालुक्यातील उमराई येथे ऊस तोडणी दरम्यान एक महिना वयाचे बिबट्याचे तीन बछडे आढळून आली. शेतातील ऊस तोड थांबविण्यात आली आहे. त्या बछड्यांवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. . - सचिन रोडे . वनक्षेत्रपाल तळोदा.



रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

कोठारच्या दरीत नवजात अर्भकाचा टाहो!

गावकरी व आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी अर्भकास जीवदान :
तळोदा तालुक्यातील कोठार येथील दरीत एक नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले आहे. या नवजात अर्भकास तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथील डॉक्टरांनी उपचार सुरु केल्याने त्याची प्रकृती स्थिर असून सदर अर्भकास पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे.. तळोदा शहरापासून सुमारे १५ किमी. अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी कोठार गाव आहे. येथूनच सातपुड्याच्या जंगलास सुरुवात होते. कोठार येथील गुलाबसिंग पाडवी हे काल शुक्रवारी २ वाजेच्या सुमारास गावानजीकच्या जंगलातून जात असतांना त्यांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे ते आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना एका लहान दरीत एक नवजात अर्भक (पुरुष जातीचे) बेवारस स्थितीत आढळून आले. याबाबत त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुलाबसिंग पाडवी यांनी कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेचे शिक्षक गोविंदू पाटील यांना याबाबत कळविले व कोणाला तरी संपर्क करण्यास सांगितले.गोविंद पाटील यांनी तळोदा
तालुक्यात आरोग्यमित्र म्हणून काम पाहणारे आ.उदेसिंग पाडवी यांच्या कार्यालयातील कौशल सवाई यांच्याशी संपर्क साधत घटनेबाबत माहिती कळविली. कौशल सवाई यांनी तळोदा पोलिस ठाण्यात संपर्क साधला व १०८ रुग्णवाहिका देण्याबाबत विनंती केली. रुग्णवाहिकेत डॉ. रिमन पावरा व कौशल सवाई हे कोठार येथे दाखल झाले. होते. डॉ. पावरा यांनी नवजात अर्भकाची तपासणी केली. अर्भकाचा श्वासोच्छवास सुरु असल्याने त्यास तातडीने प्राणवायू लावत त्याची स्वछता केली. कोठार येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नवजात अर्भकाला तातडीने तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सदर अर्भक १७०० ग्रॅम वजनाचे असून त्यावर डॉ.विजय पाटील यांनी उपचार करुन अतिदक्षता विभागात दाखल केले. तीन-चार तासापासून बाळाला दुध न मिळाल्याने त्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यावर उपचार सुरु करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीश अधिक्षक डॉ.विजय पाटील यांनी अर्भकाची पाहणी केली. सदर अर्भकास पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत नोंद करण्यात आली नव्हती..

  बाळाची प्रकृती चांगली आहे. चार-पाच तासापासून त्याला दुध न मिळाल्याने त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. त्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येवून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. . - डॉ.महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी तळोदा.










गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

बारगळ गढीच्या संवर्धनासाठी सव्वा कोटीचा निधी!

पर्यटन विभागांतर्गत होणार विकास : ऐतिहासिक वास्तूला प्राप्त होणार गतवैभव. खांदेशातील प्राचीन, ऐतिहासिक वास्तू असलेल्या तळोदा शहरातील बारगळ गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाकडून सव्वाकोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्राचीत ऐतिकासिक वास्तूचे जतन होण्यास मदत मिळणार आहे. . तळोदा शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या बारगळ गढीच्या संवर्धनासाठी जहागीरदार अमरजित बारगळ यांनी पर्यटन विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. खांदेशातील निवडक दुर्मिळ वास्तूपैकी एक असणाऱ्या तळोद्यातील बारगढ गढीला नंदुरबार, धुळे, जळगाव यासह नाशिक, पुणे, मुंबई येथून अभ्यासक, इतिहास तज्ञ, पर्यटक भेट देवून माहिती जाणुन घेतात. मात्र, काळानुरुप या वास्तूची बरीच पडझड झाली असून यातील प्रवेशद्वार, बुरुज, सभा मंडप, प्रमुख इमारत, लाकडी कोरीव काम, विविध झरोके, प्राचीन खिडक्या आदी जीर्ण झालेली आहेत. त्यामुळे या वास्तूचे संवर्धनासाठी बारगळ कुटुंबातील सदस्यांकडून प्रयत्न सुरू होते, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावर ६ फेब्रुवारी रोजी शासन आदेश पारित करण्यात आला असून तळोद्यातील गढीचा विकासासाठी अंदाजित एक कोटी २४ लाख ९१ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम बांधकाम विभागाकडे वर्ग केली जाणार आहे. मात्र, याबाबत बांधकाम विभागाकडे कुठलाही पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यलयातून झाला नसल्याचे समजते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी निधी मंजूर केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. .

तळोदा शहरातील ऐतिहासिक बारगड गढीचे संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. ६ फेब्रुवारी रोजी याबाबत शासन आदेश पारित झाल्याचे कळाले आहे. मात्र, अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी पत्र प्राप्त झालेले नाही.. - पी.जे.वळवी, . अभियंता सार्वजनिक बांधकाम. 

बारगळ गढी खांदेशातील प्राचीन वास्तू असून गढीची काळानुरुप बरीच पडझड झाली आहे. या वास्तूची डागडुजी, विविध कामे होवून तीला गतवैभव प्राप्त होणार आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी निधी मंजूर केला आहे. तर येथील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे यासाठी योगदान मिळाले आहे. . - अमरजीत बारगळ.