Breking News

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

तळोद्यात उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची चर्चा

तळोदा पालिकेच्या उपनगराध्यक्ष व सत्ताधारी भाजपाच्या व विरोधी गटातील काँग्रेसच्या स्विकृत नगरसेवक निवड उद्या दि.१ जानेवारी रोजी नवीन वर्षात होणार आहे. या पदांसाठी कोणाची वर्णी लागते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. . नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तळोदा पालिकेवर भाजपाचा झेंडा फटकला आहे. भाजपाकडे पूर्ण बहुमत असून त्यांचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. तर काँग्रेसचे ६ व शिवसेनेचा १ नगरसेवक विजयी झाले आहेत. पालिकेतील पक्षीय बलाबल पाहता उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी भाजपाचा तर भाजपा व काँग्रेसला प्रत्येकी एक स्विकृत नगरसेवक निवडता येणार आहे. उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेकांची निवड नवीन वर्षात १ जानेवारी रोजी होणार आहे. भाजपा व काँग्रेसच्या झालेल्या स्वतंत्र खाजगी बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्र.१ मधून निवडून आलेल्या भाग्यश्री चौधरी यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेस गटाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी भरतभाई माळी यांचे पुतणे जितेंद्र सुर्यवंशी (माळी) यांचे नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. जितेंद्र सुर्यवंशी हे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे पर्यायी उमेदवार होते. काँग्रेसच्या पुढील राजकारण डोळ्यासमोर ठेवून जितेंद्र माळी यांना स्विकृत नगरसेवक पद देण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर भाजपाच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी आ.उदेसिंग पाडवी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे जगदीश परदेशी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे त्यांच्या निवडीवर अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेने त्यांच्याऐवजी हेमलाल मगरे व योगेश चौधरी यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे..

तळोद्यात भाजपा व काँग्रेसचा गट स्थापन

पालिकेत भाजपा व काँग्रेसने आपले गट स्थापन केले आहेत. पालिका प्रतोदपदी नगराध्यक्ष अजय परदेशी तर गटनेतेपदी भास्कर मराठे यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रतोदपदी संजय माळी यांची तर गटनेतेपदी गौरव वाणी यांची निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड १ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी इच्छुकांनी फिल्डिींग लावण्यास सुरुवात केली आहे. उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदासाठी कोणाची वर्णी लागते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. . तळोदा पालिकेची नुकतीच पार पडली असून भाजपाने सत्तांतर घडवून आणले आहे. आ.उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त नगराध्यक्षासह ११ सदस्य निवडून आले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी पदभार स्विकारला आहे. तर १ जानेवारी रोजी उपनगराध्यख व स्विकृत नगरसेवक निवड होणार आहे. याबाबतचा अजेंडा सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आला आहे. यासाठी इच्छुकांनी
वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्यात सुरुवात केली आहे. . या निवडीच्या पार्श्वभुमीवर दि.२८ रोजी भाजपाने आपला गट स्थापन केला आहे. नगराध्यक्ष अजय परदेशी यांची प्रतोद पदी तर जेष्ठ नगरसेवक भास्कर मराठे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवारी नगराध्यक्ष अजय परदेशी व नवनिर्वाचित नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेवून नगरसेवकांचा गट स्थापन केल्याचे पत्र सादर केले. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यासह भास्कर मराठे, सुनयना उदासी, रामानंद ठाकरे, भागयश्री चौधरी, बेबीबाई पाडवी, शोभाबाई भोई, अमोद्दीन शेख, अंबिका शेंडे, सुरेश पाडवी, सविता पाडवी, योगेश पाडवी, नितीन पाडवी, जगदीश परदेशी, अनुप उदासी आदी उपस्थित होते. . काँग्रेसच्या प्रतोदपदी संजय माळी . पालिकेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या सहा नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. यात सलग चारवेळा नगरसेवक म्हणुन निवडून आलेले संजय माळी यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. तर गटनेते पदी गौरव वाणी यांची निवड करण्यात आली आहे. माजी क्रीडामंत्री ॲड.पद्माकर वळवी व माजी नगराध्यक्ष भरत माळी यांनी या दोघा अनुभवी नगरसेवकांवर जबाबदारी टाकली आहे. आता स्विकृत नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागून आहे.. गटस्थापन केल्याबाबत काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांना पत्र देण्यात आले. यावेळी संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, कल्पना पाडवी यांच्यासह माजी नगरसेवक सतीवान पाडवी, गणेश सोशल ग्रुपचे संदीप परदेशी, योगेश मराठे, जितेंद्र सुर्यवंशी, दगुलाल माळी, विकास राणे, आशिष माळी आदी उपस्थित होते..


बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

बोरीवली पार्कच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी बछड्याची निगराणी

ऊसाचे पाचट जाळत असतांना आगीत होरपडून जखमी झालेल्या बिबट्याची प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र वाढत्या थंडीमुळे तापमानाचे संतुलन ठेवण्यात वनविभागापूढे आव्हान आहे. त्यामुळे बोरीवली नेशनल पार्कच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या बछड्याला दुधाची करता भासू नये. यासाठी रॉयल क कॅनिनचे कॅट मिल्क पावडर मागविण्यात आले आहे. तसेच सदर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बछड्याची निगराणी ठेवली जात आहे.. बोरद परिसरातील गोंडाळा शिवारात शेतात पाचट जाळत असतांना नर-मादी बिबट्याने पळ काढला. मात्र आगीत अडकलेल्या एका बछड्याचा मृत्यू तर दुसरा जखमी झाला. जखमी असलेल्या बछड्याला ताब्यात घेवून वनविभागाने उपचार सुरु केल्याने प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र वाढत्या थंडीमुळे त्या बछड्याचे तापमान संतुलित ठेवण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. एका पिजऱ्यात बल्ब लावून त्याठिकाणी बछड्याला ठेवून तापमान संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगीत भाजल्याने अंगावरील जखमाही सुधारत आहेत.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सामुद्रे हे उपचार करीत असून वेळोवेळी बछड्याची तपसाणी, आहार व प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच बोरीवली नेशनल पार्कचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पेठे, जळगावचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.संजय गायकवाड, नंदुरबार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी.पाटील आदींशी संपर्क करुन बछड्याच्या प्रकृतीबाबत माहिती देवून उपचाराबाबत मार्गदर्शन करीत आहे. वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संजय अहिरे, सहायक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, वनक्षेत्रपाल सी.डी.कासार, वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक एस.डी.मोरे, भिका चौधरी आदी कर्मचारी बिबट्याच्या बछड्यावर देखरेख ठेवून आहेत. दरम्यान, गाव शिवारात नागरीकांना बिबट्याचे पुन्हा दर्शन घडले आहे. या बिबट्या मादी आणखीन एका बछड्यासोबत वावरतांना दिसून आल्याने भिती पसरली आहे..

बिबट्याच्या बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून दोन ते तीन महिने तळोदा वनविभागाच्या ताब्यात बछड्याला ठेवण्यात येईल. तसेच उपचारासाठी जळगाव येथून तज्ञ डॉक्टरांना बोलविण्यात आले आहे.. - अनिल थोरात, . उपवनसंरक्षक तळोदा..




मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

आगीत बचावलेल्या बिबट्याच्या बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा


गोंडाळा शिवारात वनविभागाने गस्त वाढविली : नागरिकांमध्ये भीती कायम
ऊसाची पाचट जाळतांना आगीत होरपळून एका बछड्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जखमी बछड्यास वनविभागाने तब्यात घेवून उपचार सुरु केले. या बछड्यावर औषधोपचार केल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होवू लागली आहे. बछड्याच्या शोधात मादी बिबट्या फिरत असून नागरीकांमध्ये भिती पसरली आहे. म्हणून वनविभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी गस्त वाढविली आहे.. तळोदा तालुक्यातील बोरदनजीकच्या गोंडाळा शिवारातील सुदाम मगन पाडवी यांच्या शेतात ऊसाची पाचट जाळण्यासाठी आग लावण्यात आली. या आगीतून नर व मादी बिबट्याच्या जोडीने शेतातून बाहेर पळ काढला. मात्र त्याठिकाणी एक महिन्याचे दोन बछडे आगीत होरपळले गेल्याने एका बछड्याचा मृत्यू झाला. तसेच दुसरा बछडा जखमी झाल्याने वनविभागाने उपचारासाठी त्यास ताब्यात घेतले. जखमी बछड्यावर वेळेवर उपचार केल्यामुळे त्याचे प्राण वाचविण्यास वनविभागाला यश आले आहे. सध्या बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने बछड्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल सी.डी.कासार यांनी सांगितले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास बछड्याच्या शोधत नर-मादी परतले असून अनेकांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. रात्रीच्या सुमारास परिसरात बिबट्या डरकाडी फोडत असल्याचे परिसरातील नागरीकांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाने बिबट्यास बंदोबस्तासाठी गस्त वाढविली आहे..


आगीमुळे जखमी बछड्याच्या पोटातील पाणी कमी झाले होते. त्याच्या पोटात पाणी वाढविण्यासाठी ओआरएसचे डोस दिली जात आहे. तसेच जखमींवर मलमपट्टी केली जात आहे. बछड्याची प्रकृती उत्तम असून येत्या दोन दिवसात पूर्णपणे प्रकृती साधारण्याची अपेक्षा आहे.. - डॉ.किशोर सामुद्रे. पशुवैद्यकीय अधिकारी.  



सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

ऊसाच्या शेतातील आगीत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

गोंडाळा शिवारातील घटना ; नर-मादी पळाले अन्य जखमी बछडा वन विभागाच्या ताब्यात
तळोदा तालुक्यातील गोंडाळा शिवारात काल दि २४ रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान ऊस तोडण्यासाठी मजुरांनी पाचाट जाळल्यांनतर शेतातून बिबट्या नर व मादी बाहेर आले. तसेच या नर व मादी बिबट्याचे दोन बछडे बाहेर आले.तसेच बछडे शेतातच असल्याने त्यापैकी एकाचा आगीमुळे मृत्यू झाला आहे तर एक आगीमुळे जखमी झाला आहे. जखमी असलेल्या बछडयास वनविभागाच्या कर्मचार्यांनी ताब्यात घेतले असून त;औषधोपचार करण्यात आले आहेत. जखमी बछडयाची प्रकृती आता चांगली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच रात्री साळे नऊ वाजेच्या सुमारास नर मादी बिबट्या शेताकडे परतले. यावेळी त्यांनी डरकाळ्या फोडल्याचे प्रत्यक्षदर्शनिनी सांगितले आहे.
                                       बोरद परिसरातील गोंडाळा शिवारातील सुदाम  मगन पाडवी यांच्या शेतात काल सकाळी उस तोडण्यासाठी पाचट जाळण्यात येत होती. मात्र शितात बिबट्याचे वास्तव आल्याचे कुन्हालाही माहित नव्हते. पाचाट जाळल्याने लागलेल्या आगीमुळे शेतातून नर मादी बिबट्याच्या जोडीने शेताबाहेर येवून पळ काढला मात्र या बिबट्याच्या जोळीला दोन मादी जातीचे बछडे असून टे केवळ एक महिन्याचे असल्याने शेतातच रहिले त्यान पळून जाने शक्य नव्हते म्हणून बछडयांचा किंचाळण्याच्या आवाज शेत मजुरांना आला म्हणून शेत मजुरांनी जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांना त्या ठिकाणी बिबट्याचे दोन बछडे आढळून आले.
 याविषयी माहिती शेतमजुरांनी सहकार्यांना दिली तसेच वनविभागाच्या कर्मचार्यांना बोल्वियात आले. तो अवेतो बिबट्याच्या  एका बछडयाच्या  आगीमुळे मृत्यू झाला होता तर दुसर्या बछडयाचे शेपूट व पंजे भाजलेले दिसून आले. वनविभागाच्या कर्मचार्यांनी जखमी बछडयाला ताब्यात घेवून त्यावर औषदपचार केले. तळोदा वनक्षेत्रपाल सी.डी.कासार वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक एस.बी.शेख,एस आय.कुंवर, राजा पवार, एस आर हजारे वाहन चालक नायदे आदींनी घटनास्थळी भेट देवून बिबट्याच्या बछडयास ताब्यात घेतले असून मृत बछडयावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वनविभागाच्या कार्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सामुद्रे यांनी जखमी बछडयावर उपचार केले. त्याला बर्न ओईल लाऊन लाईफ सेव्हिंग दृग्स दिला आहे. ग्लुकोज, व ओ.आर.एस चा डोस देण्यात आला आहे. सध्या बछडयाची प्रकृती चांगली असून धोक्या बाहेर  असल्याची माहिती डॉ. किशोर सामुद्रे यांनी दिली.

प्रतिक्रिया
एक महिना वयाचे दोन मादी जातीचे बिबट्याचे बछडे आढळून आले. ऊसाच्या शेतात जळलेल्या 
पचटमुळे आगीत होरपळून एका बछडयाचा मृत्यू झाला. पंचनामा करून त्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आला.दुसरा बछडा किरकोळ भाजला असून त्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल.     वनक्षेत्रपाल सी.डी.कासार  





 
              

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

तळोद्यातील विकास कामांना श्रेयाचे ग्रहण सत्ताधारी भाजपासह काँग्रेसचा दावा : जनता संभ्रमात

तळोदा पालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत परिवर्तनाचा नारा देवून भाजपा सत्तेत आली असून गेल्या १० वर्षापासून सत्तेत असलेल्या काूंग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आरोप-प्रत्यारोप होवून निवडणूक पार पडली असून भाजपाने पदग्रहण केले आहे. यानंतर कामांना सुरुवात झाली आहे. मात्र या विकास कामांना श्रेयाचे ग्रहण लागले आहे. सध्या सुरु असलेली कामे आपण स्वखर्चातून सुरु केल्याचे नवनियुक्त नगराध्यक्षांचे म्हणने आहे. तर ही कामे आमच्या काळातील असा दावा पदभार सोडलेल्या नगराध्यक्षा यांनी केला आहे. यामुळे याकामांबाबत तळोदेकर संभ्रमावस्थेत आहेत. . तळोदा पालिका निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे अजय परदेशी निवडून आले. भाजपाचे ११ काँग्रेसचे ६ व शिवसेनेचा एक असे एकूण १८ नगरसेवक निवडून आले. आ. उदेसिंग पाडवी यांची आक्रमकता, सभांमधून दिलेला वचननामा यामुळे परिवर्तन घडविण्यात भाजपाला यश आले. त्यांतर दि.२३ रोजी पालिकेच्या आवारात नमो स्टाईलने विधिवत पूजा करून लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी व नवनिर्वाचित नगरसेवकांनी पदभार स्विकारला. पदभार स्विकारताच पालिकेचा चेहरामोहरा बदल्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या मोकळ्या जागेवर पेव्हर ब्लॉक बसविणे, पालिका हद्दीतील झाडांना रंगकाम करणे, फलक रंगविणे आदी कामे हाती धेण्यात आली. सत्ता येताच पालिकेचे रुप बदलण्यास सुरुवात झाल्याचे भाजपा तर ही कामे आमच्या काळात मंजूर असल्याचा दावा काँग्रेस करीत आहे. पालिकेच्या प्रशासकीय विभागाकडे संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे शहरातील जनता या कामांबाबत संभ्रमावस्थेत आहे. याबाबत शहरात चर्चा सुरु आहे..

 पालिकेचा पदभार स्विकारण्यापूर्वीच स्वखर्चाने पालिकेतील आवश्यक ती कामे आम्ही केले. यात पेव्हर ब्लॉक बसविणे, फलक रंगविणे, झाडांना रंग देणे आदींचा समावेश आहे. आमदार उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाने विविध विकास कामांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात पालिकेचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. . - अजय परदेशी . नगराध्यक्ष तळोदा.

 पालिकेत बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक व रंगकामाबाबत आम्ही कुठलाही ठराव केलेला नाही. नगराध्यक्ष पदाचा पदभार सोडण्यापूर्वीच ही कामे झालेले आहेत.. - रत्ना चौधरी. माजी नगराध्यक्षा.


शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

तळोद्यातील ११ वर्षीय बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न!

प्रसंगावधान राखून पळ काढल्याने मुलगा सुखरुप : पालकांमध्ये भीती
तळोदा शहरातील नुराणी चौकीतील ११ वर्षीय बालकास तुझी आई खूप आजारी आहे, असे सांगून चारचाकी वाहनात बसवून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला आहे. बालकाचा आपले अपहरण होत असल्याचक लक्षात आल्यशाने त्याने नंदुरबार येथे प्रसंगावधन साधून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका केली आहे. गावात मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रीय झाली असल्याची चर्चा सुरु असून यामुळे पालकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिसांनी विशेष लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत असून मात्र कालच्या घटनेबाबत पालिसात नोंद करण्यात आलली नाही.. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा शहरातील नुराणी चौकात राहणाऱ्या व सहावीच्या वर्गात शिकणारा तौफिक शेख शरीफ (वय ११) हा शाळा सुटल्यावर खान्देशी गल्ली परिसरात मित्रांसोबत खेळत होता. यावेळी एका वाहनातून आलेल्या चौघांनी त्यास तेरी अम्मी काफी बिमार है उन्हे नंदुरबार ले गये है, तुझे जल्दी बुलाया' असे सांगून त्याची सायकल व्हॅनवर टाकून त्याला वाहनात बसवून नंदुरबारकडे रवाना झाले. रस्त्यावर तौफिकने पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. पाणी पिताच त्याला गुंगी येऊन झोप आली. नंदुरबार पासून काही अंतरावरील एका दारूच्या दुकानीजवळ त्या चौघांनी वाहन थांबवले. यावेळी तौफिक शुध्दीवर आला. यावेळी आजुबाजूला कोणीच नसल्याचे पाहून तौफिकने वाहनाच्या वर ठेवलेली सायकली कशीतरी काढून नंदुरबार शहराकडे पळ काढला. यावेळी त्याने एका व्यक्तीला त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन लावून द्या, अशी विनंती केली. दरम्यान, मित्रांसोबत सायकल फिरवण्यासाठी गेलेला तौफिक रात्र झाली तरी घरी आला नसल्याने वडील शेख शरीफ शेख सरदार, आई सुल्तानाबी शेख शरीफ व कुटुंबीयांनी त्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली होती. तौफिकचे मित्र, नातेवाईक गल्ली परिसरासह शाळा, शिकवणी आदी ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेत होते. तौफीकचा शोध लागत नसल्याने पोलिसंकडे तक्रार करण्याच्या निर्णय घेवून पोलिस ठाण्याकडे जात असतांनांच तौफिक फोन आला व त्याने घडलेली आपबिती वडीलांना सांगितली. पालकांनी तातडीने नंदुरबार गाठत तौफिक घरी नेले. . दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर बालकांना पळविणारी टोळी सक्रीय झाल्याचा संदेश फिरत असल्याने व त्यातच तौफिकचे झालेले अपहरण यामुळे संदेशाला पुष्टी मिळाल्याने चर्चा होवून पालकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी याकडे लक्ष ठेवून वेळीच कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी पालकांनी केली आहे. कालच्या घटनेबाबत पोलिस ठाण्यात कोणतीच नोंद करण्यात आलेली नाही..

विकासाच्या मुद्यावर काँग्रेसला कोंडीत पकडण्यात भाजपाला यश!

विकासाच्या मुद्यावर काँग्रेसला कोंडीत पकडण्यात भाजपाला यश! विश्लेषण 20 Dec 2017NewsImage ViewPrintMailClose Button AAA ईश्वर मराठे, तळोदा . मो. ९६०४४९०७२२. पालिका निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामे केली. मात्र शहरातील जनतेशी निगडीत प्रलंबित पाणी पुरवठा योजना, व्यापारी संकूल व कचरा डेपोची कामे पूर्ण करण्यात त्यांना याकाळात अपयश आले. या प्रलंबित कामांच्या पार्श्वभूमीवर सत्ता कायम राखण्यात सत्ताधारींना अपयश आले. तर निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादीकडे प्रभावी मुद्देच नसल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर संथगतीने होणारे विकास कामे, प्रलंबित विकास कामांसह पालिकेचा कारभाराचे मुद्दे घेत भाजपाने विकासाचे व्हिजन घेऊन पालिकेत परिवर्तन घडविण्यात यश मिळविले. पालिका निवडणुकीतील हा निकाल काँग्रेस व राष्ट्रवादीला आत्मचिंतन करावयास लावणारा आहे. . तळोदा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसला नाकारत सत्तांतराच्या लाटेवर स्वार झालेल्या भाजपाला मतदारांनी साथ दिली. भाजपा व काँग्रेसमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नगराध्यक्षपदी अजय परदेशी विराजमान होत ११ जागांवर विजय मिळवून पालिकेवर कमळ फुलविले. तळोदा पालिकेत काही अपवाद वगळता नेहमीच काँग्रेसची सत्ता राहिली आहे. काँग्रेसचे नेते भरतभाई माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी पालकमंत्री ॲड.पद्माकर वळवी यांच्या पाठबळावर सुरू होता. पालिका हद्दीत त्यांनी अनेक कामांना चालना दिली. मात्र, पाणी पुरवठा योजना, व्यापारी संकूल, कचरा डेपो आदी काही कामे प्रलंबित राहिली. विकास कामांची जंत्री मांडत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा जाहिरनामा घेवून काँग्रेस मतदारांसमोर गेली. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया व ऐन वेळेला बदलावा लागलेला उमेदवार यासह अनेक अडचणीतून मार्ग काढीत निवडणुकीला सामोरे गेले. तर आ.उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आमदार विकास निधीतुन शहरात दिलेला विकास निधी व केंद्रात व राज्यात भाजपा सरकार काळात झालेली विकास कामे, शहरासह तालुक्यात प्रलंबित कामांना चालना व शहरात सत्ता आल्यास २१ कलमी वचननामा घेऊन विकासाचे व्हिजन घेऊन पालिकेत सत्ता परिवर्तनाचा नारा दिला. यामुळे काँग्रेसपुढे आव्हान निर्माण करण्यात भाजपा यशस्वी झाली. पालिकेत ११ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी त्यांना फक्त सहाच जागांवर विजय मिळविता आला. शिवसेनेलाही एका जागेचा फटका बसला आहे. राष्ट्रवादीला तर खातेही उघडता आलेले नाही. पालिकेत फक्त चार जागा असलेल्या भाजपाने गेल्या दोन-तीन वर्षात नियोजनात्मक केलेल्या कामांमुळे त्यांना सत्तेचे यश मिळाले आहे. तर हा पराभव सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. पालिकेत सत्तांतर झाले असून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आ.उदेसिंग पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांना विशेष लक्ष घालावे लागणार आहे. पालिकेत काँग्रेसचे देखील सहा नगरसेवक असून शहराच्या विकासाठी सत्ताधारी व विरोधक नेमकी कशी रणनिती आखतात? विकास कामांसाठी विरोधक काँग्रेस सत्ताधारी भाजपापुढे कसे आव्हान उभे करण्यात कितपत यशस्वी होतात? तर देशात व राज्यात सत्तास्थानी असल्याचा फायदा मिळवित पाच वर्षात भाजपा शहराचा किती विकास करण्यात यशस्वी होते? याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागून असणार आहे..

गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करणार आ. उदेसिंग पाडवी : विकास कामांवर भर देण्याचे अजय परदेशी यांचे आश्वासन

पालिका निवडणूक विकासाचे व्हिजन घेऊन लढविली असून घराणेशाही व सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला जनता कंटाळली असल्यानेच जनतेने तळोद्यात भाजपाला साथ दिली आहे. निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यास कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.उदेसिंग पाडवी यांनी केले.. तळोदा पालिकेत भाजपाचा झेंउा फडकल्यानंतर आ.उदेसिंग पाडवी व लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी आमदार कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. आ.पाडवी म्हणाले की, तळोदा पालिका निवडणुकीत विकासाचे व्हिजन घेऊन लढविली. निवडणुकीत दिलेल्या २१ कलमी वचननामा दिला आहे. त्यानुसार पाच वर्षात पूर्ण करू व शहराचा चौफेर विकास करून जनतेचा विश्वास सार्थकी ठरविणार. येथील पालिका १६७ वर्ष जूनी असून एकाच घराकडे काँग्रेसची सत्ता राहिली आहे. शहराला न्याय मिळाला नाही म्हणून जनतेने काँग्रेसला नाकारले असून भाजपाचा विकास व्हिजनला साथ दिल्याचे सांगितले. शहराध्यक्ष हेमलाल मगरे, प्रदीप कर्पे, दिनेश खंडेलवाल, डॉ.किशोर पाटील व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजपा नेत्यांनी माझ्यासह नगरसेवक पदाच्या तळागाळातील उमेदवारांवर विश्वास दाखवीत उमेदवारी देऊन खा.हीना गावित, आ.उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत सामोरे जाऊन नागरिकांनी विश्वास दाखविला. मतदारांचा विश्वास व अपेक्षांना जबाबदारीने पेलवून सार्थकी ठरविण्यात येईल. हा विजय माझा नसून पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विजय आहे. प्रामुख्याने फिल्टर प्लॅन, कचर डेपो व डी.पी.रोड मोकळा करून रहदारी खुला करण्यावर भर देणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणुन निवडून आलेले अजय परदेशी यांनी सांगितले..

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

नंदुरबार नवापुरात काँग्रेस तर, तळोद्यात भाजप विजयी

नंदुरबार : राज्याचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व तळोदा नगरपालिकेचे निकाल काल (दि. १८) जाहीर झाले. त्यात, नंदुरबारला कॉँग्रेसच्या रत्ना रघुवंशी, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील तर तळोद्यात भाजपचे अजय परदेशी विजयी झाले आहेत़ . नंदुरबार जिल्ह्यातील तिनही पालिकांच्या निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्या. विशेष म्हणजे प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसतर्फे आजी-माजी मुख्यमंत्र्याच्या सभा झाल्याने चुरस वाढली होती. त्यामुळे निकालाकडे सर्वाचे लक्ष होते. सकाळी १० ला मतमोजनीला सुरुवात झाली. दीड तासात जवळपास सर्वच निकालाचे चित्र स्पष्ट झाले. तर नंदुरबारात चुरशीची लढत झाली़ याठिकाणी काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली आह़े नगराध्यक्षपदासाठी रत्ना चंद्रकांत रघुवंशी या ४ हजार ७८१ मतांनी विजयी झाल्या. तर, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील या १ हजार ७४२ मतांनी विजयी झाल्या आहेत. तळोद्यात मात्र काँग्रेसला सत्ता कायम ठेवता आली नाही. या ठिकाणी भाजपचे अजय परदेशी हे १ हजार ७९५ मतांनी विजयी झाले आहे. नगरसेवक पदासाठीही काँग्रेस सेना युतीने नंदुरबारात एकूण ३९ पैकी २८ जागा राखल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नवापूरातदेखील काँग्रेसने २० पैकी १४ जागा राखून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तळोद्यात सत्ता परीवर्तन करीत भाजपने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे..

सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

६७ टक्के मतदान

तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह नऊ प्रभागात १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात होते. रविवारी शांततेत मतदान झाले. सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली. मात्र साडेनऊ वाजेपर्यंत ४.५९ टक्के मतदान झाले. साडेअकरा वाजेपर्यंत १०.९१ टक्के मतदान झाले होते. अत्यंत संथगतीने मतदानाला सुरुवात झाली. मात्र दुपारी १२ वाजेनंतर मतदार बाहेर निघाल्याने मतदानाला गती आली. किरकोळ वाद-विवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. एकूण २६ हजार ५६२ पैकी १७ हजार ४२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात नऊ हजार १७ पुरुष तर आठ हजार ४०६ महिला मतदारांचा सामावेश आहे. एकूण ६५.५९ टक्के मतदान झाले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. संवेदनशील मतदान केंद्रावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. . सकाळी काही प्रमाणात थंडी असल्याने मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसत होता. सकाळी ७:३० ते ९:३० दरम्यान दोन तासात फक्त एक हजार २१८ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजाविल्याने ४.५९ टक्के इतके मतदान झाले, सकाळी ११:३० पर्यंत मतदान वाढून १५.५० टक्क्यांवर पोहचले. दुपारनंतर सर्वच प्रभागातील मतदान केंद्रावरील मतदानाचा वेग वाढला. दुपारी १:३० वाजेपर्यंत ३२.६६ टक्क्यांवर पोहचले. तर दुपारी ३ नंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. दुपारी ३:३० पर्यंत ४८.९२ टक्के मतदान झाले. यात ६ हजार ५९८ महिला तर ६ हजार ३९६ पुरुष मतदारांचा सामावेश होता. . आदर्श मतदान केंद्रावर . झाले मतदारांचे स्वागत. तळोदा पालिका निवडणुकीसाठी शहरात प्रथमच दोन आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रभाग नऊमध्ये मतदान केंद्राध्यक्ष अमोल बोरसे, झोनल अधिकारी तिडवे, नायब तहसीलदार आर.डी.गावित, आर.एम.राठोड यांनी प्रथम येणाऱ्या मतदारांचे स्वागत केले.. प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची . मतदान केंद्रांना भेट. तळोदा येथील मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवडणूक निरीक्षक गोरक्ष गाडीलकर यांनी काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तसेच प्रभाग एकमध्ये चुरशीच्या लढत असल्याने या प्रभागांच्या केंद्रांच्या ठिकाणी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघूर्डे, पोलिस उपअधीक्षक शिवाजी गावित, स्थागुअ शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले, पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलिस निरीक्षक मेघराम घाटे यांच्यासह पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.. पाच फेरीत मतमोजणी. तळोदा पालिका निवडणुकीची मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. येथील प्रशासकीय इमारतीत आज सकाळी १० वाजेला मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी नऊ टेबल लावण्यात आले असून एकूण २७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एक टेबलावर तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक मतदान पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक शिपाई नेमणूक केली आहे. पाच फेरीत मतमोजणी होईल. पहिल्या फेरीत प्रभाग १ ते ९ मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी दोन तासात पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निवड निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार, नायब तहसिलदार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पार पाडतील..

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

तळोदा पालिकेच्या मतदानासाठी यंत्रे झाली सील

तळोदा येथील नगरपालिका निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेसाठी काल बुधवारी (दि.१३) मतदान यंत्रांची उमेदवारांसमक्ष तपासणी करुन यंत्रे सीलबंद करण्यात आली. यंत्रे सीलबंद करण्यापूर्वी सर्व उमेदवार, निवडणूक प्रतिनिधींना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे तपासून सीलबंद केली. यावेळी ३५ केंद्रासाठी ३९ मतदान पथक व १६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.. तळोदा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि.१७ डिसेंबर रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी एकूण नऊ प्रभागात मतदान होणार आहे. त्यासाठी तळोदा येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात काल दि.१३ रोजी मतदान यंत्रांची तपासणी करण्यात आली. आठ ठिकाणी असलेल्या ३५ मतदान केंद्रांसाठी ३५ बैलट युनिट व ३५ कंटोल युनिट तर ऐनवेळी उपयोगात आणण्यासाठी ५ अतिरिक्त युनिट तयार करण्यात येवून निवडणूक रिंगणातील उमेदवार व निवडणूक प्रतिनिधींच्या समक्ष मतदान यंत्रे सीलबंद करण्यात आली. यासाठी चार टेबल लावण्यात आले होते. सदर कामकाजासाठी दोन नायब तहसिलदार व आठ तलाठींची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गौडा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्यधिकारी जनार्दन पवार, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या देखरेखीखाली ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यता आली. प्रत्येक यंत्रावर तीन भाग असून त्यात पहिल्या भागात नगराध्यक्ष पदाच्या तीन उमदेवारांची नावे व चिन्ह तर चौथ्या क्रमांकावर नोटाचे बटन आहे. त्यानंतर दुसऱ्या भागात नगरसेवक पदाच्या अ प्रभागाच्या व तिसऱ्या भागात ब प्रभागाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची नांवे व चिन्ह आहेत. तसेच प्रत्येक अ आणि ब च्या उमेदवारानंतर नोटाचे बटन आहे. दि.१६ डिसेंबर रोजी मतपेट्या निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रांवर पाठविण्यात येतील. प्रत्येक बुथवर एक मतदान यंत्र असेल ३५ केंद्रांसाठी ३९ मतदान पथक असून त्यात १५५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहा महिला कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी दिली..

मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

तळोद्यात मतदानाची तारीख बदलल्याने मतदार राजा संभ्रमात उमेदवारांच्या प्रचार ऑडीओत जुन्याच तारखेचा उल्लेख

तळोदा येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची मतदान तारीख पुढे ढकलण्यात आल्याने मतदारांमध्ये संभ्रम झाला आहे. यात उमेदवारांच्या प्रचाराच्या वाहनांवरून अजूनही १३ डिसेंबरलाच मतदान असल्याचे सांगितले जात असल्याने आणखीनच गोंधळात भर पडली आहे.. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार तळोदा पालिकेच्या निवडणूकीसाठी दि.१३ डिसेंबर रोजी मतदान व १४ रोजी मतमोजणीची तारीख निश्चित झाली होती. मात्र नगराध्यक्ष व तीन प्रभागातील नगरसेवक पदांच्या काँग्रेस उमेदवारांच्या नामनिर्देशनावर भाजप उमेदवारांनी हरकत घेतली. ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली. म्हणून भाजपच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात जिल्हा न्यायालयात अपिलात गेले होते. त्याचा निर्णय दि.४ डिसेंबर झाला. या न्यायालयीन प्रक्रियेत ठरलेल्या निवडणूक कार्यक्रमात चार दिवस वाढल्याने राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख पूढे ढकलून दि.१७ डिसेंबर रोजी मतदान घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्वांचीच डोकेदुखी वाढली आहे, उमेदवार आधीच रोजच्या खर्चामुळे बेजार झाले होते. त्यात आणखीन चार दिवसाची वाढ झाल्याने पुन्हा खर्च वाढणार आहे. अनेकांनी बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासासाठी लुक्झरी गाड्यांची बुकींग केली होती. ते बुकींग रद्द होवून नवीन बुकींग करावी लागेल. अनेकांनी जेवणावळी दिल्या होत्या, मात्र पुन्हा जेवणावळी ठेवाव्या लागतील. उमेदवारांनी प्रचारासाठी आणलेल्या डिजिटल डिस्प्लेच्या गाड्या, रिक्षा यावरुन प्रचारावर खर्च केला जात आहे. मात्र मतदानाची तारीख बदललेली असतांनाही १३ डिसेंबर रोजी मतदान असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून प्रचार करणाऱ्यांनी उमेदवारांनी आपल्या प्रचार क्लिप्समधून मतदानाच्या नवीन तारखेचा उल्लेख करण्याची गरज आहे. कारण मतदार हे एकमेकांना विचारून मतदानाच्या तारखेबाबत खात्री करीत आहेत. यापूर्वी असे कधीच घडले नसल्याने मतदान तारखेत बदलण्यावर नागरीकांचा विश्वास बसत नाही. मतदान तारीख पूढे ढकलली असून याचा कोणाला फायदा तर कोणाला नुकसान होईल, याची चर्चा रंगू लागली आहे..

रविवार, १० डिसेंबर, २०१७

११ कोटींच्या अनुदानाचा काँग्रेसकडून हिशोब घेणार मुख्यमंत्री फडणवीस :

 राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मागील तीन वर्षांत तळोदा नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असतानाही ११ कोटीचे अनुदान दिले आहे. या अनुदानाचा हिशोब येणाऱ्या काळात काँग्रेसडून घेण्यात येईल. तसेच तळोदा पालिकेत भाजपाची सत्ता आल्यावरही पारदर्शी कारभार केला जाईल. जर असे झाले नाही व जनतेच्या तक्रारी आल्या तर पालिकेत भाजपाची सत्ता असली तरी पालिका बरखास्त करु, असा इशारा वजा आश्वासन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिले.. तळोदा येथील नगरपालिका निवडणूकीतील नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काल दि.८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. याप्रसंगी खा.डॉ.हिना गावित, आ.उदेसिंग पाडवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय परदेशी, माजी नगराध्यक्षा वंदना मगरे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना.फडणवीस म्हणाले की, आज ५० टक्के लोकसंख्या ही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व रोजगारासाठी शहरात राहते. मात्र काँग्रेसने शहरांचा विकास केला नाही. शहरात मुलभूत सुविधा निर्माण केल्या नाही. झोपडपट्ट्या, प्रदुषण, सांडपाणी कचरा घाणीचे साम्राज्य वाढले असून पर्यायाने रोगराई वाढली. भाजपाची सत्ता आल्याने केंद्राच्या वतीने स्मार्ट सिटी योजना व अटल अमृत योजना, १४ व्या वित्त आयोग यातून मागील १५ वर्षाच्या काळात काँग्रेसने दिला तितकाच निधी भाजपा सरकारने केवळ तीन वर्षात दिला आहे. तळोदा शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्ग शौचालये, कचऱ्यातून खत निर्मिती, भूमिगत गटारी, शुध्द पिण्याचे पाणी व विकास कामांसाठी लागेल तितका निधी देण्यात येईल. म्हणून तळोदा पालिकेत भाजपाला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री ना.जयकुमार रावल म्हणाले की, तळोदा पालिका भाजपाच्या ताब्यात दिल्यास मुख्यमंर्त्यांमार्फत नगरविकास खात्यातून ५० कोटी खर्चून तळोद्याला आधुनिक आदिवासी शहर बनविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. . भाजपाच्या नाराज गटाने . केला मुख्यमंर्त्यांचा सत्कार!. भाजपच्या निष्ठवंतांना उमेदवारी दिली नाही, म्हणून नाराज असलेले गटातील भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, जिल्हा सरचिटणीस प्रा.विलास डामरे, तालुकाध्यक्ष श्याम राजपूत, उपजिल्हाध्यक्ष रुपसिंग पाडवी हे मुख्यमंर्त्यांच्या सभेत अनुपस्थित होते. मात्र त्यांनी मुख्यमंत्री सभास्थळी येत असतांना रस्त्यात मुख्यमंर्त्यांची गाडी थांबवली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीतून खाली उतरुन डॉ.शशिकांत वाणी व पदाधिकारी या नाराज गटाकडून सत्कार स्विकारला..

तळोदा पालिकेसाठी काही उमेदवारांच्या अपिलामुळे निवडणूक आयोगाने केला कार्यक्रमात बदल १७ डिसेंबरला होणार मतदान.

डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तळोदा नगरपालिकेची रणधुमाळी सुरु असतांना काही उमेदवारांच्या अपिलामुळे सदर निवडणूक प्रक्रियेत राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यामुळे दि.१३ डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया दि.१७ रोजी व १८ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी दिली.. तळोदा : डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तळोदा नगरपालिकेची रणधुमाळी सुरु असतांना काही उमेदवारांच्या अपिलामुळे सदर निवडणूक प्रक्रियेत राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यामुळे दि.१३ डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया दि.१७ रोजी व १८ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी दिली.. तळोदा येथे निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी पत्रपरिषदेत घेवून निवडणूक कार्यक्रमात बदल झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मुदत संपणाऱ्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार व नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली. मात्र निवडणूक रिंगणातील काही उमेदवारांच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे महाराष्ट्र नगरपरिषद निवडणूक नियम १९६६ मधील नियम क्रंमाक (ड) मधील तरतुदी विचारात घेवून तिन्ही पालिकेतील मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. तळोदा नगरपालिकेसाठी दि.१३ डिसेंबर रोजी होणार मतदान दि.१७ डिसेंबर रोजी रविवारी होईल. तसेच दि.१८ रोजी मतमोजणी प्रक्रिया घेण्यात येणार असल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहेत. तळोदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १(ब) व ९(ब) नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाचा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रावर झालेल्या अपिलामुळे जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मतदान तारखेत बदल करणे आवश्यक होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणूकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.. 

गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

प्रचाराची वेगवेगळी क्लुप्ती ठरतेय मतदारांचे आकर्षण!

तळोदा नगरपालिकेची निवडणुकीसाठी प्रचारासाठी चांगलाच वेग आला आहे.
१३ डिसेंबर रोजी मतदान असून प्रचारासाठी केवळ सहा दिवसांचा कालावधी राहीला आहे. यामुळे नेते, उमेदवार व त्यांचे समर्थक विविध क्लुप्ती वापरुन आपापल्या प्रभागातील मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.. येथील पालिका निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही प्रभागांमध्ये दुरंगी तर काही प्रभागांमध्ये तिरंगी लढती होत आहेत. दि. १३ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असल्याने उमेदवारांकडे प्रचारासाठी केवळ सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणूक असल्याने नेते, नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना केवळ एक प्रभाग न करता संपूर्ण प्रभागात प्रचारासाठी पायपीट करावी लागत आहे. यामुळे वैयक्तीक भेटी, हितसंबंध यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. तसेच बॅनर बनवून ते व्हाट्सअप, फेसबुक यावर अपलोड करुन सोशल मिडीयावर प्रचार करण्यात येत आहे. कॉर्नर सभासह वाजत गाजत प्रचार फेऱ्या काढण्यात येत आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यालयाकडून विविध पक्षाचे झेंडे, दुपट्टा, टोपी आदी साहित्य कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. त्याचा वापर प्रचाराच्या वेळी केला जात आहे. मोटारसायकलींना पक्षाचे झेंडे लावून ते प्रभागात फिरतांना दिसत आहेत. काही ठिकाणी महिला व
पुरुष गटागटाने मतदारांना भेटत आहेत. काही प्रभागात मतदारांसाठी पाट्र्यांचे आयारेजन केले जात आहे. तसेच उमेदवार व कार्यकर्त्यांच्या डोक्यावर, अंगावर पक्षाचे चिन्ह असलेले कपडे, टोपी परिधान करुन प्रचारावर भर दिला जात आहे. काँग्रेसकडून पक्षाची चिन्ह असलेले कपडे परिधान केलेले चौधारी दाम्पत्य तर भाजपातर्फे गाढे हे प्रचार करीत असल्याने ने आकर्षण ठरले आहेत. पक्षाचा प्रचार-प्रचारसाठी शहर पिंजून काढत असून प्रचाराचे मोठे माध्यम ठरले आहे. पक्षांकडुन प्रचाराचे माध्यम म्हणुन लोप पावत चाललेल्या लोककलेचा उपयोग केला जात आहे. वासुदेवचा माध्यमातून दान पावल! म्हणत विविध गीतांच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. .


बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

भरत माळी व संजय माळी यांचे नामनिर्देशन मंजूर योजना माळी यांचा अर्ज रद्द : पर्यायी उमेदवाराच्या अर्जाला मान्यता

तळोदा नगर पालिकेचा निवडणूकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या छाननीवेळी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत बबनराव माळी, जितेंद्र लक्ष्मण माळी यांचा अर्जावर भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय परदेशी यांनी तर प्रभाग क्र.१ ब मधील काँग्रेसचे नगरसेवक पदाच्या उमेदवार योजना भरत माळी यांचा अर्जावर भाजपाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी आणि प्रभाग क्र.९ ब मधील काँग्रेसचे उमेदवार संजय बबनराव माळी यांचा अर्जावर भाजपाचे उमेदवार किरण अशोक सुर्यवंशी यांनी हरकत घेतली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी दोघा पक्षांच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादानंतर काँग्रेसच्या उमेदवारांवर घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळत त्यांचे अर्ज मंजूर केले होते. . निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णयावर शहादा सत्र न्यायालयात दि.२८ नोव्हेंबर रोजी अपील दाखल करण्यात आले होते. याबाबत जिल्हासत्र न्यायालयात न्यायमूर्ती गोंधळीकर यांच्या समोर दि.३० नोव्हेंबर व दि.२ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. या सुनावणीबाबत काल दि.४ तारखेला निकाल देण्यात आला. जिल्हा सत्र न्यायालयाने योजना भरत माळी यांचे नामनिर्देशन रद्द ठरविले आहे. तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत माळी व नगरसेवक पदाचे उमेदवार संजय माळी यांच्या उमेदवारीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निकाल कायम ठेवत नामनिर्देशन मंजूर केले आहेत. . दरम्यान, योजना भरत माळी यांनी नामनिर्देशन पत्र भरतांना काँग्रेस पक्षातर्फे जोडपत्र अ व ब सादर केले आहे. ब प्रपत्र मध्ये योजना भरत माळी यांना पर्यायी उमेदवार म्हणून प्रतिभा दगुलाल माळी यांना दिलेले असल्याने त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्रात सर्व बाबींची पूर्तता असल्याने योजना माळी यांचा अर्ज नामंजूर झाल्यामुळे प्रतिभा माळी यांचा नामनिर्देशन पत्र मंजूर करण्यात आले आहे..

शनिवार, २ डिसेंबर, २०१७

तळोद्यात नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार

तळोदा येथील पालिका निवडणुकीत काल माघारीच्या शेवटच्या दिवशी पाच जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले. नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदांचे तीन उमेदवारी छननीत हरकत घेण्यात येवून त्यावर अपीलात गेले आहेत. . तळोदा पालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या मुदतीत पाच जणांनी माघार घेतली आहे. नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात अजय छबुलाल परदेशी (भाजपा), भरत बबनराव माळी (काँग्रेस), जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी (अपक्ष), जोहरी देवेश पन्नालाल (राष्ट्रवादी) यांचा सामावेश आहे. तर नगरसेवक पदाच्या १८ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. प्रभाग क्र.१ अ मध्ये अरविंद मधुकर पाडवी(काँग्रेस), रामानंद शिरीषकुमार ठाकरे (भाजपा). प्रभाग क्र.१ ब मध्ये भाग्यश्री योगेश चौधरी (भाजपा), योजना भरत माळी,प्रभाग क्र.२ अ मध्ये स्वप्नील वसंत बैसाणे (भाजपा), हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय (काँग्रेस), पिंपळे उध्दव राजाराम (राष्ट्रवादी). प्रभाग २ ब मध्ये गुलशनबी सरवर पिंजारी (भाजपा), अनिता संदीप परदेशी (काँग्रेस), दिपमाला विवेक चौधरी(शिवसेना). प्रभाग क्र.३ अ मध्ये बेबीबाई हिरालाल पाडवी (भाजपा), पार्वताबाई जयराम पाडवी (काँग्रेस). प्रभाग क्र.३ ब मध्ये भास्कर दत्तू मराठे (भाजपा), सुनील नामदेव मराठे (काँग्रेस), निमेशचंद्र मगनलाल माळी (शिवसेना). प्रभाग क्र.अ मध्ये शोभाबाई जालंदर भोई (भाजपा), कुरेशी हाजरा बी रईस (काँग्रेस). प्रभाग ४ ब मध्ये शेख अमनोद्दीन फखरोद्दीन (भाजपा), महेंद्र हिरालाल बागुल (काँग्रेस), चंद्रकांत दशरथ भोई (राष्ट्रवादी), शेख इमरान लियाकत (शिवसेना), सय्यद इद्रीस अली अब्बास अली (एमआयएम). प्रभाग क्र.५ अ मध्ये सुरेश महादू पाडवी (भाजपा), प्रकाश मिऱ्या ठाकरे (काँग्रेस). प्रभाग ५ ब मध्ये अंबिका राहुल शेंडे (भाजपा), अपर्णा अनिल माळी (काँग्रेस). प्रभाग क्र.६ अ मध्ये सविता नितीन पाडवी (भाजपा), अश्विनी गोविंदा पाडवी (काँग्रेस), रजूबाई मधुकर वळवी (राष्ट्रवादी). प्रभाग ६ ब मध्ये हेमलाल पुरुषोत्तम मगरे (भाजपा), सुभाष धोंडू चौधरी (काँग्रेस), विनोंद पांडू वंजारी (शिवसेना), प्रभाग क्र. ७ अ मध्ये योगेश प्रल्हाद पाडवी (भाजपा), भांग्या सिंगी पाडवी (काँग्रेस), नरोत्तम वासुदेव नाईक (राष्ट्रवादी). प्रभाग क्र.७ ब मध्ये सुनयना अनुपकुमार उदासी (भाजपा), सुवर्णा पंकज राणे (काँग्रेस), कल्पना देवेंद्र पाटील (शिवसेना), प्रभाग क्र.८ अ मध्ये आनंदकुमार महेंद्र सोनार (भाजपा), गौरव देवेंद्रलाल वाणी (काँगेस), भरत मक्कन चौधरी (अपक्ष), प्रभाग ८ ब मध्ये शर्मिला मोहन माळी (भाजपा), वैशाली अंबालाल चव्हाण (काँग्रेस), प्रतीक्षा वाल्मिक ठाकूर (शिवसेना), वत्सला रमेश मगरे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र.९ अ मध्ये रंजिता अविनाश प्रधान (भाजपा), कल्पना सतीवान पाडवी (काँग्रेस), गीता मोहन पाडवी (शिवसेना), शिल्पा संदीप वळवी ( राष्ट्रवादी). प्रभाग क्र.९ ब मध्ये किरण अशोक सुर्यवंशी (भाजपा), संजय बबनराव माळी (काँग्रेस) हे नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत..